जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरण; चेतन सिंगचा नार्को चाचणीला नकार

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार करणाऱया आरपीएफचा जवान चेतन सिंगने नार्को चाचणीला नकार दिला आहे. बोरिवली रेल्वे पोलिसांनी चेतनच्या नार्को चाचणीसाठी न्यायालयात विनंती केली होती. चेतनच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरपीएफचा जवान चेतन सिंगने केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलीस तपास करत आहेत. चेतन हा तपासात सहकार्य करत नसल्याने काही बाबींचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे बोरिवली रेल्वे पोलिसांनी नुकताच जयपूर-मुंबई एक्सप्रेस, मिरारोड रेल्वे स्थानक, कांदिवली कारशेड येथे जाऊन क्राइम सीन केला होता. क्राइम सीनच्या माध्यमातून नेमका गोळीबार कसा झाला हे पोलीस समजून घेत आहेत.

चेतन हा तपासात सहकार्य करत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तो प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती पोलिसांना देतो. त्यामुळे त्याने नेमका का गोळीबार केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चेतनची नार्को चाचणी करण्यास परवानगी मिळावी यासाठी रेल्वे पोलिसांनी बोरिवली न्यायालयाला विनंती केली होती; मात्र चेतनने नार्को चाचणीला नकार दिला. जर चेतनची नार्को चाचणी झाली असती तर काही बाबी उघड झाल्या असत्या.