इथे आम्हाला तिकीटं मिळत नाही आणि हे सोन्याची तिकीटं वाटतायत! जय शहा यांच्यावर क्रिकेटप्रेमींचा आगपाखड

हिंदुस्थानात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 5 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने या स्पर्धेसाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. बीसीसीआय भारतातील दिग्गजांना सोन्याचं तिकीट देऊन सामने पाहण्यासाठीचे निमंत्रण देण्यात येत आहे. बीसीसीआयने अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांना हे सोन्याचे तिकीट दिले असून या यादीत सुपरस्टार रजनीकांतचेही नाव जोडले गेले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रजनीकांत यांना गोल्डन तिकीट दिले आहे.

बीसीसीआयने एक्स (ट्विटर) वर एक फोटो शेअर केला आहे. जय शाह रजनीकांत यांना सोन्याचे तिकीट देतानाचा हा फोटो आहे. बीसीसीआयने या पोस्टमध्ये म्हटलंय की, “बीसीसीआय सचिव जय शाह यांनी रजनीकांत यांना गोल्डन तिकीट देऊन त्यांचा सन्मान केला.” बीसीसीआयने याआधी बॉलिवूडचे महान अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही असे तिकीट दिले होते. याव्यतिरिक्त क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही गोल्डन तिकीट देण्यात आले आहे. हे तिकीट देण्यात येत असल्याचे पाहून क्रिकेटप्रेमींनी असे तिकीट हिंदुस्थानचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही द्यावे अशी मागणी केली आहे. त्याला हे तिकीट देणार अथवा नाही याबाबत सध्या माहिती मिळालेली नाही. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. हिंदुस्थानचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे हा सामना खेळवण्यात येईल.

57 लाखांना तिकीट

आयसीसी वर्ल्ड कपच्या हिंदुस्थानच्या लढतींसाठी तिकिटांची मारामारी होणार हे आधीच स्पष्ट होते. मात्र 14 ऑक्टोबरला हिंदुस्थान-पाकिस्तान या क्रिकेटयुद्धासाठी अक्षरशः तिकीटयुद्धच पेटले होते. 20 हजार रुपये किमतीची तिकिटे चक्क 57 लाख रुपयांच्या चढय़ा दराने ‘वियागोगो’ या संकेतस्थळावर विकायला ठेवली होती. या किमतीवरून क्रिकेटचाहत्यांनी बीसीसीआय आणि आयसीसीला सोशल मीडियावर शिव्यांची लाखोली वाहिली होती. 3 ऑक्टोबरला हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्री ‘बुक माय शो’वर सुरू झाली, पण प्रत्यक्षात जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निव्वळ निराशाच पडली होती. या सामन्याची तब्बल 90 हजारे तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे गुजरात क्रिकेट संघटनेच्या सूत्रांकडून कळले होते. मात्र किती तिकिटे ऑनलाईन विक्रीला ठेवली होती, याबाबत अधिकृत माहिती कुणाकडूनही मिळू शकली नाही.

एकीकडे सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना तिकीटे मिळत नसताना दुसरीकडे मान्यवरांना सोन्याची तिकीटे दिली जात असल्याबद्दल क्रिकेटप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला. बीसीसीआयच्याच पोस्टवर लोकांनी आपला राग व्यक्त करताना काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहा