झारखंडची ‘ज्योती मौर्य’, पतीने मोलमजुरी करून शिकवलं, नोकरीला लावलं; आता सोबत राहण्यास दिला नकार

उत्तर प्रदेशमधील एसडीएम ज्योती मार्य यांचे प्रकरण सध्या तुफान गाजतंय. पतीने शिक्षणासाठी मदत केल्यानंतर ज्योती मौर्य यांनी त्याला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्या ट्रोलही होत आहेत. आता असाच काहीसा प्रकार झारखंडमध्येही घडला आहे. येथे पतीने मोलमजुरी करून पत्नीला शिकवलं, तिला नोकरीला लावलं. मात्र यानंतर तिने पतीसोबत राहण्यास नकार दिला.

झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातील बांझी बाजार येथील कन्हाई पंडित यांचे लग्न 2009मध्ये कल्पना कुमारी हिच्याशी झाले. लग्नानंतर कल्पनाने पुढे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. घरच्या परिस्थितीमुळे कन्हाई पंडित यांनी सुरुवातीला आढेवेढे घेतले, मात्र पत्नीच्या इच्छेपुढे त्यांनाही मान तुकवावी लागली. पत्नीला आधी महाविद्यालयीन आणि त्यानंतर नर्सिंगचे शिक्षण दिले. यासाठी त्यांनी कर्जही घेतले.

कन्हाई यांनी पत्नीच्या नर्सिंग कोर्ससाठी दोन लाख रुपये फी भरली. तसेच दोन वर्षांच्या शिक्षणासाठी अडीच लाखांचा खर्चही केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कल्पनाने जुमावती नर्सिंग होममध्ये कामास सुरुवात केली. दुसरीकडे कन्हाई ट्रॅक्टर चालवून आणि मोलमजुरी करून कर्जाची परतफेड करत होता. 200-250 रुपये रोजाने कर्ज कसे चुकवणार असे म्हणत पत्नीने त्यांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कन्हाई गुजरातला कामासाठी गेले.

कोरोना काळातही पत्नीच्या विरोधामुळे कन्हाई गुजरातमध्येच थांबले. मार्च 2023मध्ये ते घरी परतले. घरी आल्यानंतर कन्हाई यांना पत्नीचे वर्तन बदलल्याचे जाणवले. ती दिवस रात्र कामासाठी बाहेर राहू लागली. पती-पत्नीमधील संबंधही पहिल्यासारखे राहिले नाहीत. त्यानंतर 14 एप्रिल रोजी ती 10 वर्षांच्या मुलाला घेऊन गेली तर परत आलीच नाही. 28 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन पत्नी फरार झाल्याची तक्रार कन्हाई यांनी पोलिसात केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत कल्पनाला फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही.

पीडित कन्हाई यांनी जिल्हा न्यायालय, उपायुक्त आणि एसपींकडे तक्रार केली असून न्यायाची मागणी केली आहे. पत्नीला शिकवण्यासाठी जो खर्च झाला तो आपल्याला परत मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच मुलाची कस्टडीही त्यांनी मागितली आहे. यासह जाताना पत्नीने घरातून नेलेल्या वस्तूही आपल्याला जसे आहे तसे पाहिजे असल्याचे त्यांनी म्हटले.