मंत्रिमंडळ विस्ताराची फक्त चर्चा; आजचा मुहूर्तही हुकला, इच्छुकांची नाराजी

अजित पवार यांच्या सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णयानंतर सत्ताधाऱ्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे. भाजप-मिंधे गट-अजित पवार गट अशा तिघांची अचानच युती झाल्यानंतर अजित पवारांसोबत आलेल्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आणि त्यामुळे मिंधे गटाचे कोट शिवून तयार असलेले नेते कमालीचे नाराज झाले. इतकंच काय तर भाजपमधील नेत्यांमध्येही अस्वस्थता आहे. बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदं आणि पक्षासाठी कष्ट करणाऱ्यांसाठी मात्र काही नाही, अशी कुजबुज सुरू आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी आशेवर वरिष्ठांकडून नेत्यांची समजूत काढली जात होती. मात्र विस्तार पावसाळा अधिवेशनाआधी होईल अशी शक्यता सध्यातरी दिसत नसल्यानं, तोंडाला पानं पुसली जात असल्याची भावना खासगीत बोलली जात असल्याचं वृत्त वृत्तवाहिन्यांवरून दिलं जात आहे.

खातेवाटपावरून आधीच वाद रंगला आहे. त्यातही वाद मिटवण्यासाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अशा तिघांची गुरुवारी जवळपास दीड तास बैठक सुरू होती. या बैठकीत नक्की काय चर्चा झाली ते कळू शकलेली नाही, मात्र खातेवाटपच महत्त्वाचा विषय असल्यानं त्यावर चर्चा झाली असण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला मात्र आता पावसाळी अधिवेशना नंतरचा मुहूर्त उजाडणार अशा पुड्या सोडल्या जात आहेत. अधिवेशनात संख्याबळ टिकून राहण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात आहे. तेव्हा अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचं लॉलीपॉप दाखवलं जात असल्याची देखील चर्चा आहे.

दरम्यान, बुधवारी अजित पवार गटातील सुनील तटकरे यांनी उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा देखील हवेतच विरली.