रंग ‘मैथिली’चे! पाच मनस्वी महिला कलाकारांची अभिव्यक्ती

काळाघोडा असोसिएशनतर्फे ‘मैथिली’ या पाच महिला कलाकारांचे चित्र प्रदर्शन आर्ट एन्ट्रन्स गॅलरी, आर्मी-नेव्ही बिल्डिंग, काळाघोडा येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता काळाघोडा असोसिएशनच्या अध्यक्षा ब्रिंदा मिल्लर यांच्या हस्ते होईल.

प्रतिभा वाघ, ज्योत्स्ना सोनवणे, रेखा भिवंडीकर, मिता व्होरा, पानेरी भिवा पुणेकर या चित्रकारांच्या कलाकृती रसिकांना या प्रदर्शनात पाहायला मिळतील. प्रदर्शनात सहभागी चित्रकारांची स्वतःची अशी वेगळी शैली कला रसिकांना चित्र उत्सवाचे दर्शन घडवेल हे निश्चित. स्त्री ही शक्तीची अभिव्यक्ती आहे. ‘मैथिली’ या प्रस्तुत प्रदर्शनात स्त्री शक्ती कॅनव्हासवर अवतरीत झालेली रसिकांना पाहायला मिळेल.

कॅनव्हासवरील उत्स्फूर्त रंग, अद्भुत आकार यांच्या स्वरूपातील चैतन्यमय ऊर्जा रसिकांना एका आगळय़ा अनुभवाचे प्रत्यंतर देईल. महिला चित्रकारांच्या प्रतिभेचा उत्सव साजरा करणारे हे प्रदर्शन चुकवू नये असेच आहे. एकाच छताखाली वेगवेगळय़ा विषयांवरची वैविध्यपूर्ण आशय व्यक्त करणारी चित्रे कला रसिकांना या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

प्रदर्शन 10 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत रसिकांना पाहता येईल.