वादग्रस्त ‘डीन’मुळेच कळवा रुग्णालय बदनाम

>> वसंत चव्हाण

कळवा हॉस्पिटलमध्ये सहा दिवसांत 27 हून अधिक रुग्णांचे बळी गेल्याने हे रुग्णालय आहे की मृत्यूचा कारखाना, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत वादग्रस्त डीन लाभल्यामुळेच कळवा हॉस्पिटल बदनाम झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णांशी गैरवर्तन, लाचखोरी, विनयभंग, चुकीची भरती, पदाचा दुरुपयोग असे कारनामे करणारे डीन या रुग्णालयाला मिळाल्याने हॉस्पिटलची अब्रू अक्षरशः चव्हाटय़ावर आली आहे. त्यातील अनेक डीनना राजकीय आशीर्वाद लाभल्यामुळेच मनमानी कारभार करण्यात आला. अशा बेफिकीर ‘डीन’मुळेच रुग्णांच्या उपचाराकडे तसेच सोयीसुविधांकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे.

 कळवा हॉस्पिटलच्या कारभाराबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महासभा तसेच स्थायी समितीच्या बैठकांमध्ये डीनच्या बेफिकीर कारभाराचा पर्दाफाशही करण्यात आला. तरीदेखील कळवा हॉस्पिटलची आरोग्य यंत्रणा सुधारली नाही. 30 वर्षांच्या काळात सुरुवातीची फक्त दहा वर्षे पूर्णवेळ डीन लाभले. त्यानंतर मात्र डीन पदाचा कधी अतिरिक्त कार्यभार, तर कधी तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला. पण संबंधित व्यक्ती या पदासाठी सक्षम आहे की नाही हे कुणीच तपासले नाही. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत पाच मुख्य वैद्यकीय अधिकारी व पाच वैद्यकीय अधीक्षक यांनाच कळवा हॉस्पिटलचे डीन करण्यात आले. विशेष म्हणजे, स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या बगलबच्च्यांची नेमणूक या पदावर केल्याने रुग्णालयाच्या कारभाराचा पूर्ण बट्टय़ाबोळ झाला. सध्या कळवा हॉस्पिटलचे डीन म्हणून डॉ. राकेश बारोट हे काम पाहत असून त्यांच्याकडे तात्पुरता चार्ज देण्यात आला आहे.

पात्र अधिकारी नेमा

2020 साली वैद्यकीय अधिकारी व डीन या पदासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देऊनही ती प्रक्रिया पूर्ण न करता तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका  करण्यात येत आहेत. हे सर्व बेकायदेशीर आहे. त्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर कायमस्वरूपी आणि पात्र अधिकाऱ्यांचीच नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी लेखी मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

चंद्रहास तावडे (सामाजिक कार्यकर्ते)

 हे पहा कारनामे

डॉक्टरची चुकीची भरती भोवली

डॉ. राम केंद्रेः वैद्यकीय अधिकारी म्हणून 5 ते 6 वर्षे काम करत होते. एका चुकीच्या डॉक्टरच्या भरतीप्रकरणी त्यांना निलंबित केले होते. ते वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखले गेले होते. त्यानंतर केंद्रे हे निवृत्त होणार होते. मात्र, राजकीय आशीर्वाद असल्याने एका बडय़ा नेत्याच्या सांगण्यावरून पुढील 2 वर्षे त्यांना वाढवून देण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केंद्रे यांना घरी बसवले.

चुकीच्या प्रकरणांना मंजुरी

 डॉ. भीमराम जाधवः डॉ. भीमराव जाधव यांना तात्पुरत्या स्वरूपात डीन पदाचा कार्यभार देण्यात आला. या महाशयांनी एकाच वेळी डीन व वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा बेकायदेशीरपणे पदभार सांभाळला. कोविड  काळात अनेक चुकीच्या प्रकरणांस मंजुरी दिली. कळवा रुग्णालयातील जागा एका खासगी संस्थेला देण्याचा घाट घातला त्याच्या करारपत्रावर सही केली.

न्यायालयाने ठरवले दोषी

डॉ. संध्या खडसेः येवला येथून ठाणे पालिकेच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. येवला येथे एका लहान मुलाच्या अकाली मृत्यू प्रकरणात फेरफार केल्याने न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. कळवा रुग्णालयाच्या सेवेत रुजू होताना त्यांनी कागदपत्रात घोळ करून वस्तुस्थिती लपवली होती.

विनयभंगाचा गुन्हा

डॉ. शैलेश्वर नटराजनः यांनीदेखील डीन म्हणून काम पाहिले होते. त्यांच्यावर विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनाही बाजूला करण्यात आले होते.

कळवा पोलिसांकडून चौकशी

 डॉ. अभय कुलकर्णीः सुरुवातीला चांगला डॉक्टर म्हणून त्यांची ओळख झाली होती. मात्र, हॉस्पिटलमधील रुग्णांशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कळवा पोलीस ठाण्यामध्ये अजून त्याची चौकशी सुरू आहे.

व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीकडून लाच

डॉ. राजू मुरुडकरः या महाशयांनी तर स्वतःची वेगळीच ओळख निर्माण करून प्रसिद्धी मिळवली आहे. कोरोना काळात महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत असताना त्यांना दुर्बुद्धी सुचली आणि व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीकडून लाच मागितल्याप्रकरणी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यांची शैक्षणिक पात्रता नसतानादेखील डीन पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची ठाणे, नवी मुंबई आणि भिवंडी येथे स्वतःची खासगी रुग्णालये असून कळवा हॉस्पिटलमध्ये ते अजूनही कार्यरत आहेत.

महिला अधिकाऱ्याचा छळ

 डॉ. योगेश शर्माः यांच्यावरदेखील एका गुह्याची केस दाखल होती. त्यांच्यावर एका प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. रुग्णालयातील महिला सहकारी अधिकाऱ्याचा छळ केल्या प्रकरणी कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.