कमला एकादशीनिमित्त पंढरीत 3 लाख भाविक

वारकरी संप्रदायात अधिकमासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मासामध्ये कमला एकादशी आल्यामुळे श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन आणि चंद्रभागेत स्नान करण्यासाठी तीन लाखांहून अधिक भाविकांनी पंढरीमध्ये गर्दी केली होती. भरपावसात वारकऱयांनी एकादशीचे व्रत आणि धार्मिक विधी पूर्ण करून वारी पोहचती केली. यावेळी देवाच्या पदस्पर्श दर्शनाला सात ते आठ तास लागत होते.

अधिक मासातील कमला एकादशी व यातच शनिवार असल्याने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येत होती. राज्यभरातून भाविक मोठय़ा संख्येने येत असल्याने त्यांच्या वाहनांनी शहरातील वाहनतळ हाऊसफुल्ल झाले असल्याचे दिसून आले. भाविकांमुळे मंदिर परिसर, चंद्रभागा नदी परिसर, दर्शनरांग, प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग, स्टेशन रोड, गोपाळपूर भाविकांनी फुलून गेले आहे.

चंद्रभागेत मुबलक पाणी असल्याने भाविकांनी चंद्रभागा स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर नगरप्रदक्षिणा करताना दिसत होते. दर्शनरांगेत उभे राहून पदस्पर्श दर्शन घेण्यावर भाविक दिसून येत होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत होत्या.

मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

दरम्यान, कमला एकादशीनिमित्त विठ्ठलभक्त राम जांभुलकर यांनी मंदिरात झेंडू, शेवंती, गुलछडी, ऍष्टर, गुलाब आदींसह 25 प्रकारच्या फुलांची आकर्षक सजावट केली होती. ही सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

शिवसेनेच्या वतीने फराळवाटप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने श्रीक्षेत्र पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वारकऱयांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख रवि मुळे, अरुण कोळी, सुनील सर्वागोड, सुधीर धुमाळ आदी उपस्थित होते. उपशहरप्रमुख तानाजी मोरे यांनी या वाटपाचे आयोजन केले होते.