भिवंडीत मिंधे गटाचा भाजपवर बहिष्कार, 35 हजार कोटींचा घपला करणाऱ्या कपिल पाटलांचा प्रचार करणार नाही

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कालपर्यंत कपिल पाटील यांच्याबरोबर गावागावात प्रचार करणाऱ्या मिंधे गटाने अचानक भाजपवर बहिष्कार घातला. ठाणे जिल्हा अध्यक्ष मारुती धिर्डे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत घेत भिवंडी लोकसभेत आमचाच उमेदवार हवा, 35 हजार कोटींचा घपला करणाऱ्या कपिल पाटील यांचा आम्ही प्रचार करणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे मिंधे आणि भाजपमध्ये वादाचा तडतडबाजा वाजू लागला आहे.

भाजपने भिवंडी लोकसभा मतदारसंघ केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज मिंधे गटाने पत्रकार परिषद घेऊन कपिल पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. मिंधे गटाचे शहापूरचे जिल्हाध्यक्ष मारुती धिर्डे यांनी पाटील हे खासदार झाल्यानंतर आम्हाला बाजूला फेकतात. आमच्या पक्षाचे आमदार पाडण्याचे काम करतात. आमच्याच जीवावर निवडून येऊन पाच वर्षे त्रास देतात. त्यामुळे कपिल पाटील यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका धिर्डे यांनी घेतली आहे. कपिल पाटील यांनी 35 हजार कोटींचा घपला केल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.

मिंधे गटाचे तालुकाध्यक्ष वसंत लोणे, शहापूरचे तालुकाध्यक्ष प्रकाश वेखंडे, ठाणे जिल्हा सचिव कांतीलाल कुंदे या पदाधिकाऱ्यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

शिंदे गटाच्या पोटदुखीवर उपचार केले जातील

शहापूर तालुक्यातील शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कालपर्यंत माझ्यासोबत प्रचार करत होते. आज अचानक त्यांना कोणती पोटदुखी झाली. त्यांच्या आजारावर वेळीच उपचार केले जातील असा गर्भित इशारा कपिल पाटील यांनी मिंधे गटाला दिला आहे.