सुख, समृद्धी, शांती आणि भरभराटीसाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीला करा ‘हे’ काम

2022 वर्ष संपत आहे आणि नवीन वर्ष म्हणजेच 2023 साल काही तासांतच सुरू होणार आहे. नवीन वर्ष प्रत्येकासाठीच सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यातूनच आपल्याला नव्याने काम करण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येकालाच नवीन वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि प्रत्येक कामात प्रगती होवो, असे वाटत असते. यासाठी तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी काही नवीन वस्तू खरेदी करून घरात आणू शकता. जाणून घेऊया वास्तूशास्त्रानुसार, कोणत्या नवीन वस्तू घरात आणणे महत्त्वाचे मानले जाते.

तुळशीचे रोप
तुळशीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. भगवान विष्णूलाही तुळस प्रिय आहे. तिची पूजा केल्याने लक्ष्मीदेवी आणि श्रीविष्णूची कृपा प्राप्त होते. हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही घरात तुळशीचे रोप लावण्याचा विचार करत असाल आणि ते नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही ते घरी आणू शकता. तुळशीमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मकता वाढवण्याची क्षमता असते. तुळशीमुळे कुटुंबियांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते. घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावा तसेच यासाठी स्वच्छ जागा निवडा.

शंख
हिंदू धर्मात शंखाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समुद्र मंथनातून निघालेल्या 14 रत्नांपैकी शंख एक आहे, अशी मान्यता आहे. त्यामुळे ज्या घरात शंख आहे, त्या घरात लक्ष्मीदेवीचा वास नेहमीच असतो. शंख घरात ठेवल्याने अडथळे दूर होतात, आर्थिक संकटे येत नाहीत, असे वास्तुशास्त्र सांगते. शंखाची खरदी करून त्याची पूजा करा.

मोराचे पीस
घराच्या मुख्य द्वारावर मोराचे पीस लावणे शुभ मानतात. हा खूप सोपा उपाय आहे. वास्तुशास्त्रानुसार, मोराच्या पिसात लक्ष्मीदेवीचा वास असतो. एवढेच नाही, तर मोराचे पिस भगवाना विष्णुला जास्त प्रिय आहे. मोराच्या पिसामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. घरात 1 ते 3एवढी मोरपिसे ठेवावीत यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. यासाठी मोराची तीन पिसे घेऊन ‘ओम द्वारपालाय नमः जागरे स्थिराय स्वाहा’ हा मंत्र लिहून गणपतीच्या मूर्तीखाली ठेवावा.

छोटा नारळ
वास्तुशास्त्रानुसार, एक छोटा नवीन नारळ वर्षाच्या पहिल्या दिवशी अवश्य विकत घ्यावा. यामुळे वास्तूतील समृद्धी वाढते. लाल कापडात हा नारळ गुंडाळून तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवलेले असतात तिथे ठेवा. यामुळे घरात पैसे आणि धान्याची कमतरता भासत नाही. घरातील धान्याचा साठा भरलेला राहतो.

धातूचे कासव
धातूच्या छोट्या कासवाला विशेष महत्त्व आहे. कासव हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. क्रिस्टल, पितळी किंवा चांदीची कासवाची मूर्ती घरी आणू शकता. ज्या घरात कासव असतो त्या घरात पैशाची चणचण भासत नाही, असे वास्तूशास्त्र सांगते. नोकरी, व्यवसायात प्रगती होते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

धातूचे हत्ती
वास्तूशास्त्रानुसार, गृहदोष दूर करण्यासाठी धातूच्या 2 हत्तींची मूर्ती घरात आणल्याने सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. धातूचे हत्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते. धातूपासून बनवलेला हत्ती घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते. यासोबतच घरात आनंद टिकून राहतो. यासाठी धातूनपासून बनवलेली किंवा हत्तीची धातूची मूर्ती नक्की घरी आणा.