निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा सारे जग पाहत आहे, आदित्य ठाकरे यांनी फटकारले

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रचारासाठी एक प्रेरणागीत नुकतेच प्रसारीत केले आहे. त्या गीतातील दोन शब्द हटवण्यासाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला नोटीस पाठवली आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला फटकारले आहे.

”जय भवानी, जय शिवाजी… हा मंत्र महाराष्ट्राचा श्वास आहे. पण निवडणूक आयोगाचे भाजपसाठी वेगळे नियम आहेत. निवडणूक आयोगाचा हा पक्षपातीपणा जग पाहत आहे. आम्ही आमच्या देशातील लोकशाहीसाठी लढत आहोत. ज्यांना यंदाची निवडणूक ही देशातली निष्पक्ष निवडणूक पुन्हा कधीच होऊ द्यायची नाही त्या हुकुमशाही विरोधात आमचा हा लढा आहे. “जय भवानी, जय शिवाजी” म्हणायला आमच्यावर बंदी का घालत आहेत? आम्ही भाजप नाही म्हणून? की केंद्र सरकारमधील महाराष्ट्र विरोधी शक्तींमुळे?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.

प्रेरणा गीतातील ‘जय भवानी’ शब्द हटवणार नाही; उद्धव ठाकरे यांचा निर्धार

आम्ही धर्माच्या आधारावर मते मागितली नाहीत. हिंदू या शब्दाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. तसेच जय भवानी, जय शिवाजी हा महाराष्ट्राचा जयघोष आहे. त्यामुळे या प्रेरणा गीतातील हे शब्द कोणत्याही परिस्थितीत हटवण्यात येणार नाही. आमच्या वर कारवाई करायची असेल तर आधी धर्माच्या नावाने प्रचार करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर कारवाई करा, असे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ठणकावून सांगितले आहे. मुंबईतील मतोश्री या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मते मांडली.