Lok Sabha Election 2024 – बारामतीत अजित पवार गटाने केलेल्या सर्व्हेक्षणात सुप्रिया सुळेच आघाडीवर!

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना पहायला मिळणार आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आमनेसामने असणार आहेत. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली असली, तरी अजित पवार गटाने अद्याप या जागेवर उमेदवार दिलेला नाही. मात्र सुप्रिया सुळे यांच्यापुढे सुनेत्रा पवार यांचेच आव्हान असणार हे जवळपास निश्चित आहे. सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादीकडून त्याच्या प्रचाराचा शंखही फुंकण्यात आला आहे. आमदार रोहित पवारही गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहे. याच दरम्यान त्यांनी एक विधान केले असून यामुळे ते चर्चेत आले आहेत.

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ हवेली तालुक्यातील फुरसुंगी येथे महाविकास आघाडीच्या वतिने आयोजित संवाद बैठकीला आमदार रोहित पवार उपस्थित राहिले आणि त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना ते म्हणाले की, बारामतीमध्ये अजित पवार गटाकडून आपल्या उमेदवाराच्या चाचपणीसाठी आतापर्यंत 9 सर्व्हे करण्यात आले आहेत. या सर्वच सर्व्हेमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. त्यामुळे आता त्यांना दहावा सर्व्हे करावा लागेल आणि त्यानंतर ते योग्य तसा निर्णय घेतील. तसेच बारामतीतून सुप्रिया सुळे किमान अडीच लाख मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.

बारामतीकर जनता विरुद्ध अजित पवार यांनी घेतलेला निर्णय व भाजप अशा प्रकारची स्थिती बारामतीमध्ये आहे. येथे सुप्रिया सुळे निवडून येणारच आहेत, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. भाजपने ज्या पद्धतीने कुटुंब व पक्ष फोडलेले आहेत त्यावरून त्यांचे मतदारसुद्ध त्यांना आणि पुरस्कृत पक्षांना मतदान करणार नाहीत. भाजपचे अनेक कार्यकर्ते अजित पवारांचा प्रचार करणार नाही, तर तुतारीचा प्रचार करतील, असेही ते म्हणाले.

हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है; रोहित पवार यांचे सूचक विधान