महाविकास आघाडीच्या झंझावातापुढे छगन भुजबळांनी हात टेकले; नाशिक मतदारसंघातून घेतली माघार

लोकसभा निवडणूक प्रचारात महाविकास आघाडीच्या झंझावातापुढे महायुती निस्तेज झाली आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीच आज याची जाहीर ग्वाही दिली. नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांनी आज माघार घेतली. उमेदवार ठरवण्यास होत असलेल्या विलंबामुळे आपण माघार घेत असून या विलंबाचा फटका महायुतीला बसेल, अशी भीतीही भुजबळ यांनी व्यक्त केली.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याची घोषणा छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत केली. नाशिकमध्ये उमेदवार जाहीर होण्यास खूपच उशीर होत असल्याने संभ्रम निर्माण होऊन महायुतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपण माघार घेत असल्याचे ते म्हणाले. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सुचवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले.

महायुतीमध्ये आपल्या नावाबद्दल ठरले असतानाही तीन आठवडे संपले असले तरी जागावाटपाची माहिती जाहीर झालेली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होऊन त्यांचा प्रचारदेखील सुरू झाला. तो प्रचार आता इतका पुढे गेला आहे की, महायुतीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे, असा इशाराही भुजबळ यांनी दिला.

अमित शहांनी माझ्या नावाचा आग्रह धरला होता

महायुतीमध्ये जागावाटपाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यावेळी अजित पवार यांनी नाशिकची मागणी केली होती. समीर भुजबळांचे नाव त्यांनी सुचवले होते. येथून आमचे माजी खासदार समीर भुजबळ लढतील असे अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र तेथून छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी असा शहा यांचा आग्रह होता, असा दावा भुजबळ यांनी यावेळी केला.

कुणालाही उमेदवारी द्या, पण 20 तारखेपर्यंत द्या

नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबद्दल तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. कोणत्याही पक्षाला उमेदवारी द्या, मात्र 20 एप्रिलपर्यंत उमेदवार जाहीर करा, असा सल्लादेखील छगन भुजबळ यांनी महायुतीला दिला आहे.