Lok Sabha Election 2024 : सुरतमधील काँग्रेस उमेदवार बेपत्ता

सुरत मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा निवडणूक अर्ज बाद करण्यात आला. निवडणुकीत उभ्या असणाऱया उर्वरीत आठही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आल्याची घोषणा करण्यात आली. सुरतमधील भाजपच्या या निवडणूक फिक्सिंगवरून आरोप- प्रत्यारोप सुरू असतानाचा कॉँग्रेस उमेदवार असणारे नीलेश कुंभानी एकाएकी बेपत्ता झाले आहेत. कुंभानी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सुरतमधील भाजप उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. सत्ताधार्यांनी दबावाचा वापर करून कॉँग्रेस उमेदवाराचा बाद करून दलाल यांना विजयी घोषित केल्याचा आरोप करत या मतदारसंघात पुन्हा निवडणूक व्हावी अशी मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. नीलेश कुंभानी यांच्या निवडणूक अर्जावरील सूचकांच्या सह्या बोगस असल्याचा आक्षेप भाजपकडून घेण्यात आला होता. सूचक म्हणून ज्यांच्या असल्याच सांगण्यात येत होते. त्या तिघांनीही प्रतिज्ञापत्राद्वारे सह्या आपल्या नसल्याचे सांगितले होते. तेव्हापासून ते तिघेही गायब झाले आहेत. त्यापाठोपाठ उमेदवारी अर्ज बाद झाल्यावर निलेश कुंभानी हे सुद्धा 72 तासांहून बेपत्ता  आहेत.

कोण आहेत नीलेश कुंभानी?

नीलेश कुंभानी पाटीदार आरक्षण आंदोलनादरम्यान प्रसिद्ध झाले होते. हार्दिक पटेल याने 2015 मध्ये मध्ये भाजपा सरकारविरोधात केलेल्या पाटीदार आंदोलनात कुंभानी यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. सुरतमध्ये 18 लाख मतदारांपैकी 6.50 लाखांहून अधिक पाटीदार मतदार आहेत.  भाजपने येथून पाटीदार उमेदवार दिल्याने सुरतमधील मोठे बांधकाम व्यवसायीक असलेल्या नीलेश कुंभानी यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती.

जनता का गद्दार…

नीलेश कुंभानी यांच्याशी काँग्रेस नेत्यांनी फोनवरुन संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. पण ते नॉट रिचेबल असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. कुंभानी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर ‘जनता का गद्दार’ असा उल्लेख असलेले फलक फडकावत संताप व्यक्त केला.