मोदी म्हणजे ‘असत्यमेव जयते’चे प्रतीक; काँग्रेसचे जोरदार तडाखे

वारंवार असत्य आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज काँग्रेसने चांगलेच तडाखे दिले. लोकसभा निवडणुकीतील ख्रऱया मुद्दय़ांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच मोदी खोटेनाटे बोलत असून, ते म्हणजे असत्यमेव जयतेचे प्रतीकच असल्याची टीका काँग्रेसने पत्रकार परिषदेत केली.

पक्षाच्या जाहीरनाम्यात ‘संपत्तीचे पुनर्वितरण’ असा उल्लेख वा संकल्पना कुठे आहे हे दाखवून देण्याचे आव्हानही काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपच्या या जाळ्यात काँग्रेस सापडणार नाही तर, बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्दय़ांवरच आम्ही लक्ष पेंद्रीत करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

 निर्लज्जपणे ध्रुवीकरणाची भाषा

मोदींनी ‘400 पार’ आणि ’मोदी की गॅरंटी’चे नारे देणे बंद केले आहे आणि ध्रुवीकरणाची नवीन भाषा वापरत आहेत. जातीय, धार्मिक ध्रुवीकरण हे त्यांचे नेहमीच हत्यार राहिले आहे, परंतु लक्ष विचलित करण्यासाठी आता ते अधिक निर्लज्जपणे ध्रुवीकरणाची भाषा वापरत आहेत, असा दावाही रमेश यांनी केला.

आमची खेळपट्टी रोजच्या जगण्यातील समस्यांची

जय शहा आणि अमित शहा यांनी तयार केलेल्या खेळपट्टीवर आम्ही खेळावे अशी पंतप्रधानांची इच्छा आहे, पण आम्ही त्या खेळपट्टीवर खेळणार नाही. ज्या खेळपट्टीवर बेरोजगारी, महागाई, वाढती आर्थिक विषमता अशा समस्या आहेत त्या खेळपट्टीवर खेळू, असे रमेश यांनी सांगितले.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील कलांनुसार काही राज्यांमध्ये भाजपची पीछेहाट झाली आहे आणि इतर ठिकाणी 2019 च्या तुलनेत त्यांच्या जागा कमी होत आहेत, असा दावा त्यांनी केला.

मोदींचा प्रचार खोटारडा

n मोदी निवडणूक प्रचाराचा अजेंडा वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आधी आमच्या जाहीरनाम्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला आणि नंतर ‘न्याय पत्र’मध्ये नसलेल्या गोष्टींबद्दल बोलले. हा खोटारडेपणावर आधारित प्रचार आहे, असा आरोप रमेश यांनी केला.

n मोदींच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढली आहे, महागाईला लगाम बसत नाही आणि आर्थिक विषमता वाढली आहे, हे स्पष्ट आहे, असेही ते म्हणाले.

n आमचा अजेंडा सकारात्मक आहे. आम्हाला बेरोजगारी, महागाई आणि संविधान आणि संस्थांवर हल्ला यांसारख्या लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवायची आहे, असे त्यांनी सांगितले.