फक्त आश्वासने देणे हेच भाजपचे वैशिष्ट्य; शरद पवार यांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपची भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. मोदी यांनी 10 वर्षात अनेक आश्वासने दिली. मात्र, त्यापेकी किती आश्वासने पूर्ण झाली आहेत. त्यामुळे फक्त आश्वासने देणे, हे भाजपचे वैशिष्ट्य आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला. नरेंद्र मोदी देशातील लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करून देश हुकूमशाहीकडे नेत असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेत माढा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली. या निवडणुकीमध्ये जे उमेदवार पक्षाने दिले आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहेत. सोलापूर जिल्हा नेहमीच पुरोगामी राहिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात महाविकास आघाडीचा विजय होईल, असेही ते म्हणाले.

भाजपने 400 पारच्याऐवजी 545 पार असा नारा द्यायला हवा, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकशाही व्यवस्था नष्ट करत हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मोदी आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन यांच्यात फरक नाही, असेही असे शरद पवार म्हणाले. ईडी, सीबीआयचा गैरवापर करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूत्र आहे. मोदी लोकशाही उद्ध्वस्त करून हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहेत. मोदी यांची अनेक भाषणे पंतप्रधानपदाला शोभण्यासारखी नाहीत. त्यांनी गेल्या निवडणुकीवेळी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील अनेक आश्वासने आजही पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे फक्त आश्वासने देणे हेच भाजपचे वैशिष्ट्य आहे, असा हल्लाबोलही शरद पवार यांनी केला.