महाराष्ट्रातून निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 14 हजारांवर तक्रारी, सर्वाधिक तक्रारी मुंबई, पुण्यातून

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातून निवडणूक आचारसंहिता व अन्य बाबींसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 14 हजारांहून अधिक तक्रारी गेल्या आहेत. आयोगाच्या संकेतस्थळावर या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यातील बहुतांश तक्रारी निकाली काढल्या गेल्याचा दावा आयोगाने केला आहे.

महाराष्ट्रातील मतदारांकडून निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 14 हजार 753 इतक्या तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी 14 हजार 368 तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. महाराष्ट्रातील तक्रारींमध्ये पुणे जिह्यातून सर्वाधिक म्हणजे 2 हजार 818, मुंबई उपनगरातून 2 हजार 331 आणि ठाण्यातून 2 हजार 183 तक्रारी करण्यात आल्या. हिंगोली जिह्यातून सर्वांत कमी म्हणजे 34 तक्रारी आलेल्या आहेत.