नवरा-बायको दोघेही सरकारी नोकरीत असल्यास एकालाच निवडणूक ड्युटी; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदान या आठवड्यात होणार आहे. या निवडणूकीत इलेक्शन ड्युटीबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पती-पत्नी दोघेही सरकारी नोकरीत असल्यास दोघांनाही निवडणूक ड्युटी लावण्यात येणार नाही. दोघांपेकी एकालाच इलेक्शन ड्युटी लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील मुख्य निवडणूक कार्यालयाकडून हे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा निर्वाचन निवडणूक अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. त्यानंतर त्या दोघांपैकी एकालाच निवडणूक ड्युटी लावण्यात येणार आहे.

पती-पत्नी दोघेही सरकारी नोकरीत असल्यास त्यांच्या समस्या लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. देशभरात 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. तर 4 जूनला मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक 44 दिवस सुरू राहणार आहे. त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटी देण्यात येते. मात्र, पती-पत्नी दोघेही सरकारी नोकरीत असल्यास एकालाच निवडणूक ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात 80 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे.