Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदी संघाला विसरले! प्रकाश आंबेडकर यांचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपूर्णपणे विसरले आहेत. दोन वर्षात ते संघ मुख्यालयाकडे फिरकलेही नाहीत. मोदींना संघाचे पाय कापून पुढील 47 वर्षे पंतप्रधान राहायचे आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मारला.

नांदेड, परभणी आणि हिंगोलीत आज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभा घेतल्या. या सभेत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या घटनेत बदल केला जाणार नाही असे म्हटले आहे. पण त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवावा, असा सवाल आंबेडकर यांनी केला. पुढील 47 वर्षे आपण राज्य करणार असा दावाही मोदी यांनी केला आहे. त्यामुळे भाजपला मतदान करणारांनी मोदी 47 वर्षांनंतर किती वर्षांचे होती याचाही विचार करावा असे ते म्हणाले. इलेक्टोरल बॉण्डस खरेदी करणारांमध्ये औषधी कंपन्यांचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने रोखे घेणारांची नावे जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हा घोटाळा समोर आला. ज्या कंपन्यांची औषधे मानकानुसार प्रमाणित नाहीत, अशांनीच बॉण्ड खरेदी केल्याची माहिती आहे. या कंपन्यांना कोण पाठीशी घालत आहे, हे जगजाहीर आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

मौत के सौदागर का हार्दिक स्वागत

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुजरात दंगलीवरून नरेंद्र मोदी यांच्यावर ‘मौत का सौदागर’ अशी टीका केली होती. इलेक्टोरल बॉण्डच्या खरेदीमध्ये ज्यापद्धतीने औषधी कंपन्यांचा समावेश दिसून आला आहे त्यावरून सोनिया गांधी यांची टीका खरी ठरल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी नांदेड, परभणीत येत आहेत. ‘मौत के सौदागर का हार्दिक स्वागत’ असे फलक ठिकठिकाणी लावा, असेही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.