लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात अटीतटीची लढाई

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यात महाराष्ट्रात मराठवाडय़ातील 3 आणि विदर्भातील 5 मतदारसंघांत शुक्रवार, 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये मराठवाडय़ातील परभणी, हिंगोली आणि नांदेड तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ-वाशीम, बुलढाणा, अकोला आणि वर्धा या मतदारसंघांचा समावेश आहे. या आठही मतदारसंघांत अटीतटीची लढाई होणार आहे. नांदेड मतदारसंघात प्रत्यक्ष निवडणुकीत उभे नसले तरी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. तर अकोल्यातून निवडणूक लढवत असलेले वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

यवतमाळमध्ये थेट लढत

यवतमाळ -वाशीम मतदारसंघात शिवसेनेचे संजय देशमुख आणि शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. राजश्री पाटील यांना विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापून उमेदवारी दिली आहे.

अशा होणार लढती…

नांदेडमध्ये चिखलीकर विरुद्ध चव्हाण
नांदेड लोकसभा मतदारसंघ अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे चर्चेत आहे. येथून भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी थेट लढत होत असली तरी अशोक चव्हाण यांच्यासाठी ही कसोटी असणार आहे.

हिंगोलीत नवख्या उमेदवारांचा सामना

हिंगोली मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नागेश पाटील आष्टिकर आणि शिंदे गटाचे बबनराव कदम पाटील कोहळीकर यांच्यात सामना होत आहे. हे दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

परभणीत संजय जाधव हॅट्ट्रिक साधणार

परभणी मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार खासदार संजय जाधव हे हॅट्ट्रिक करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. महायुतीकडून रासपचे महादेव जानकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

अकोल्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे, कॉँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात आहेत. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

– बुलढाणा मतदारसंघात शिंदे गटाकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यापुढे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नरेंद्र खेडेकर यांचे तगडे आव्हान आहे.

-वर्धा मतदारसंघात भाजपचे खासदार रामदास तडस विजयाची हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्यापुढे राष्ट्रवादीचे अमर काळे यांनी तगडे आव्हान उभे केले असून तडस-काळे यांच्यात लोकसभेचा सामना रंगणार आहे.

अमरावतीत तिरंगी

अमरावतीत भाजपशी घरोबा केलेल्या नवनीत राणा, कॉँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून उभे असलेले दिनेश बूब यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.