Lok Sabha Election 2024 : तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही! शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून बारामती मतदारसंघातील जनतेला धमक्या दिल्या जात असल्याची चर्चा सुरू असताना आज खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर सभेत धमकीची चिठ्ठी वाचून दाखविली. ‘अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे. कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद आहे’, असा पलटवार शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर केला.

शरद पवार यांनी आज बारामती आणि पुरंदरसह अन्य जिरायती भागाचा दौरा केला. उंडवडी कडेपठार आणि सुपे येथे त्यांच्या सभा झाल्या. ‘घडय़ाळाला मतदान केले नाही तर पाणी मिळणार नाही, कारखान्याला ऊस जाणार नाही’, असा धमकीचा मजकूर असलेली चिठ्ठी शरद पवार यांनी भरसभेत वाचून दाखवली. अजित पवार गटाकडून अशा धमक्या दिल्या जात असल्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. ‘अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे. कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भिक न घालणारी ही अवलाद आहे’, अशा शब्दांत शरद पवार यांनी अजित पवार गटाला सुनावले.

ज्यांना अधिकार दिले त्यांनी कामे केली नाहीत

यावेळी शरद पवार यांनी जनाई-शिरसाई सिंचन योजनेबाबत भाष्य केले. या योजनेच्या कामाची जबाबदारी मी ज्यांच्यावर दिली होती त्यांनी ही जबाबदारी पार पाडली नाही. मी गेली 20 वर्षे स्थानिक विषयात लक्ष घालत नव्हतो. परंतु आता लक्ष घालून काम पूर्ण करणार आहे. कारण या भागातील लोकांनी मला भरभरून प्रेम दिले. ही सर्व माझी माणसं आहे. माझ्या माणसांचे प्रश्न सोडविणे ही माझीच जबाबदारी आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

भाजपसोबत जाण्यासाठी बारामतीकरांनी मते दिली नाहीत

गेल्या दहा-वीस वर्षांत मी बारामतीत स्थानिक राजकारणात लक्ष दिले नाही. चांगले काम करा, अडचण असल्यास सांगा, अशी भूमिका घेतली. मात्र, काहिंनी टोकाची भूमिका घेतली. भाजप हा सर्वसामान्यांच्या हिताची जपणूक करणारा पक्ष नाही. बारामतीकरांनी भाजपसोबत जाण्यासाठी मते दिली नाहीत, असा टोला शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवारांना लगावला.

मोदी संविधान बदलतील

केंद्र सरकारमधील मंत्रीच जाहीरपणे सांगत आहेत की, संविधानात बदल करण्यासाठी मोदींना निवडून द्या. त्यामुळे मोदी जर पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलण्याची भीती आहे, असे पवार यांनी सांगितले. मोदींवर टीका केली म्हणून झारखंड, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरूंगात टाकले. ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे. या हुकूमशाहीला लगाम घातला नाही तर मूठभर लोकांच्या हाती सत्ता जाईल. आज सर्व सत्ता मोदींच्या हाती आहे. त्यातून आपल्याला सुटका करायची आहे, असे ते म्हणाले.

इस्त्रायल दौऱयाचा किस्सा…मोदींचा लोकशाहीवर विश्वास नाही

यावेळी शरद पवार यांनी केंद्रात कृषीमंत्री असताना केलेल्या इस्त्र्ाायल दौऱयाचा किस्सा सांगितला. नरेंद्र मोदींना कळले मी इस्त्र्ाायलला चाललो आहे. त्यावेळी त्यांनी फोन करून तुमच्या शिष्टमंडळात समावेश करा, अशी विनंती केली. मी म्हटलं ठीक आहे. आम्ही इस्त्र्ाायलला गेलो. दोन दिवसांच्या दौऱयात शेतीचे निरिक्षण केले आणि परत आलो. पण मला मोदी म्हणाले, मी मागे थांबतो. मोदींनी मागे राहून काय केले याची मी चौकशी केली असता मोदींनी इस्त्र्ाायलच्या लष्करशाहीची शक्ती कशी आहे? याची माहिती घेण्यासाठी ते थांबले होते. आम्ही शेती बघायला गेलो होतो. पण मोदींनी ही पण माहिती मिळविली. कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, असे पवार यांनी सांगितले.

हा गडी थांबणारा नाही

अजित पवार गटाकडून वेळोवेळी शरद पवार यांच्या वयावरून टिप्पण्णी केली जाते. त्याचा समाचार शरद पवार यांनी घेतला. अनेकजण माझं वय 84, 85 झालं असं म्हणतात. 85 वर्षांचा योद्धा काय करणार? असंही म्हणतात. त्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही वय काढू नका. तुम्ही अजून काय पाहिले आहे? हा गडी थांबणारा नाही. ज्या लोकांनी साथ दिली त्यांना वाऱयावर सोडणारा नाही. तुमच्यासाठी शेवटपर्यंत काम करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असे पवार यांनी सांगितले.

मला माझ्या बोटांची काळजी वाटू लागली

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी केंद्रात कृषीमंत्री होतो. त्यावेळी गुजरातमधील शेतकऱयांना सुखी करण्याचे धोरण मी राबविले. मोदींना मदत केली. ते कोणत्या पक्षाचे आहेत हे मी पाहिले नाही. एक दिवस मोदी म्हणाले, बारामतीला यायचे आहे. मोदी बारामतीत आले, त्यांनी चांगल्या गोष्टी पाहिल्या आणि पत्रकारांना म्हणाले, मी शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो. मला माझ्या बोटांची काळजी वाटू लागली, असे शरद पवार यांनी सांगताच सभेत हशा पिकला.