सांगलीत विजयाची मशाल पेटवणार; काँग्रेसच्या मेळाव्यात निर्धार

देशाच्या लोकशाहीवर आलेले संकट दूर करण्यासाठी भाजपला हद्दपार केलेच पाहिजे. त्यासाठी आघाडीचा धर्म पाळून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे रहायला हवे असे नमूद करत महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना निवडून आणणार आणि सांगली लोकसभा मतदारसंघात विजयाची मशाल पेटवणार, असा निर्धार आज काँग्रेसच्या मेळाव्यात  करण्यात आला.

काँग्रेस पक्षाचा आज सांगलीत मेळावा झाला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते. या मेळाव्यात सांगली जिह्यातील सर्व काँग्रेस तालुकाध्यक्षांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर नेत्यांनी मार्गदर्शन केले.

चंद्रहार पाटील यांनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट

महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या तिन्ही नेत्यांनी उमेदवार चंद्रहार पाटील यांना शुभेच्छा देत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही दिली. या वेळी माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष, आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते उपस्थित होते.

‘पंजा’सोबत ‘मशाल’ तेवत ठेवा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमकपणे कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. भाजप जर पुन्हा सत्तेवर आली तर देशासमोर संकटांची मालिका उभी राहील. लोकशाहीवर आलेले संकट दूर करण्यासाठी भाजपला हद्दपार करावे. कमळ कोमेजले पाहिजे. त्यासाठी ‘पंजा’सोबत ‘मशाल’ तेवत ठेवावी. सांगलीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणावे, असे आवाहन पटोले यांनी केले.

चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, सध्या भाजप हटवणे हाच प्रमुख हेतू आपल्यासमोर आहे.  भाजपला हद्दपार केल्याशिवाय गत्यंतर नाही हे ओळखून तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी राज्यात मोठय़ा जोमाने लोकसभा निवडणूक लढवत आहे. राज्यातील इतर भागांत हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या हातात हात घालून काम करीत आहेत. त्यामुळे सांगलीमध्ये काँग्रेसच्या वाटय़ाला उमेदवारी आली नाही म्हणून नाराज न होता आघाडीचा धर्म म्हणून आपण सर्वांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

आघाडीच्या धर्माचे पालन झाले पाहिजे

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन प्रमुख पक्षांसह इतर घटक पक्षांच्या महाविकास आघाडीमार्फत या लोकसभा निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. परंतु महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला मिळाली. त्यामुळे आता काँग्रेसच्या सर्वोच्च पातळीवर निर्णय झालेला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळून सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे यासाठी काम करावे, असे त्यांनी सांगितले.

चंद्रहार पाटील यांना मतदान करू

माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीच्या धर्माचे पालन करतील, असे सांगितले. वरिष्ठ जो काही आदेश देतील तो आम्ही पाळू. महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना मतदान करावे आणि देशातून भाजपला हटवावे, असे आवाहनही कदम यांनी केले.

बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार

सांगलीत काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीची दखल पक्षाने घेतली आहे. याबाबतचा अहवाल दिल्लीला वरिष्ठांकडे पाठवला जाईल आणि बंडखोर विशाल पाटील यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  पत्रकारांशी बोलताना दिली.