राज्यात डी.एड. अभ्यासक्रमाला मिळेना विद्यार्थी, पहिल्या फेरीत तीन हजार 947 विद्यार्थ्यांचा प्रवेश

महाराष्ट्रात गेली काही वर्षे ‘डी.एड.’ अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याची बाब समोर आली आहे. याही वर्षी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असणाऱया विद्यार्थी संख्येपेक्षा कमी अर्ज राज्यात प्राप्त झाले आहेत. नगर जिह्याची अवस्थादेखील राज्यातील प्रवेशासारखी असल्याची बाब समोर आली आहे. राज्यात पहिल्या फेरीत अवघ्या तीन हजार 947 विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता 31 हजार 207 एवढी आहे. प्रवेशासाठी 13 हजार 798 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर केले आहेत. पहिल्या फेरीमध्ये 6 हजार 728 विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता आहे. त्यापैकी 3 हजार 927 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. दुसऱया प्रवेश फेरीमध्ये 4 हजार 788 जागा मंजूर आहेत. त्यासाठी किती विद्यार्थी पात्र ठरतात, हे महिनाअखेरीस समोर येणार आहे.

एकेकाळी महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावरती अध्यापक विद्यालय सुरू करण्यात आले होते. एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता होती. मात्र, सध्या शिक्षकभरतीची प्रक्रिया वेगाने होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संधी गमावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे फारसे आकर्षित होत नसल्याची बाबही समोर आली आहे. राज्यात सध्या 16 शासकीय अध्यापक विद्यालये, 97 अनुदानित, तर 462 विनाअनुदानित अध्यापक विद्यालये सध्या कार्यरत आहेत.

नगर जिल्ह्यात अवघे 515 प्रवेश

नगर जिह्यामध्ये अवघ्या 515 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. जिह्यात 26 अध्यापक विद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. एक हजार 480 विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता आहे. त्यातील 330 विद्यार्थी हे अनुदानित प्रवेश क्षमतेचे आहेत, तर 1 हजार 150 विद्यार्थी विनाअनुदानित प्रवेश क्षमतेचे आहेत. जिह्यात पाच अनुदानित अध्यापक विद्यालये असून, 21 विनाअनुदानित अध्यापक विद्यालये सध्या सुरू आहेत. आत्तापर्यंत जिह्यामध्ये शासकीय कोटय़ामधून 508 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर व्यवस्थापन कोटय़ातून अवघ्या सात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आत्तापर्यंत नगर जिह्यात 515 विद्यार्थ्यांनी विद्यालयात प्रवेश घेतले आहेत.

विद्यार्थी मिळत नसल्याने डी.एड. विद्यालये बंद

महाराष्ट्रात काही वर्षांपासून विद्यार्थी उपलब्ध होत नसल्यामुळे राज्यातील अनेक डी.एड. विद्यालये बंद करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांशी जोडून असलेले डी.एड़ अभ्यासक्रमाचे वर्ग यापूर्वीच बंद केले आहेत. खासगी विनाअनुदानित संस्थांनादेखील विद्यार्थ्यांसाठी धावाधाव करावी लागत असल्यामुळे राज्यातील अनेक अध्यापक विद्यालयांनी यापूर्वीच अध्यापक विद्यालये बंद करण्याचे प्रस्ताव शासनाला सादर केले होते. मागील वर्षापेक्षा यावर्षी 21 अध्यापक विद्यालयांनी प्रवेशप्रक्रिया थांबवली आहे. खासगी संस्थांनाही विद्यार्थी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी शोधण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे.

भरती होईना, शिकून करायचे काय?

राज्यात गेली काही वर्षे अध्यापक विद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील शाळा, विद्यालयांमध्ये भरती होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. महाराष्ट्रात दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी पदवी व पदविका प्राप्त करून नोकरीच्या बाहेर आहेत. त्यातच शिक्षण हक्क कायद्याचे अस्तित्वात आल्यानंतर डी.एड. पात्रतेबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा, संस्थाचालकांसाठी मुलाखती यांसारख्या प्रक्रियेतून जावे लागत आहे. राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल तीन चार टक्केच्या पुढे जात नाही. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नाही म्हणून नोकरीची संधी मिळत नाही. अशा दृष्ट चक्रामध्ये विद्यार्थी सापडल्यामुळे डी.एड. अभ्यासक्रमाकडील ओढा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर या संदर्भातील प्रक्रिया आणखी किचकट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन नोकरी उपलब्ध नसल्याने विद्यार्थी पूर्णतः डोळेझाक करत असल्याचे समोर आले आहे.