वाचावे असे काही – मिशन चिपकोचा प्रवास

>>धीरज कुलकर्णी

पर्यावरण हा या युगातील कळीचा मुद्दा बनला आहे. मानवी हव्यासापोटी झालेली जंगलतोड, प्लॅस्टिकचा वाढलेला वापर, गाडय़ांमुळे होणारे प्रदूषण यामुळे आपण आजपर्यंत फक्त ऐकत असलेला पर्यावरणाचा नाश हा आपल्या दारात येऊन उभा ठाकला. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ हा शब्द गेली दोन दशके आपण ऐकतो आहोत, पण त्याची सुरुवात बरीच अगोदर झाली आहे.

पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे बर्फाळ प्रदेशात सतत होणारी भूस्खलने, त्यामुळे वाढलेली समुद्राची पातळी, पाण्याखाली जाणारी किनारपट्टीवरील शहरे, गावे, तिथे होणारा जैवविविधतेचा नाश… अशा कितीतरी गोष्टी आपल्या लक्षात आता आल्यात. ऋतूंमध्ये होणारे बदल अधिकाधिक तीव्र होत चाललेत. पर्यावरण बचावासाठी जगभरात आता बरेच प्रयत्न होत आहेत तसेच लोकांमध्ये जागृतीही होते आहे.

1973 साली उत्तराखंडमध्ये चिपको आंदोलन झाले. गर्द वृक्षराजीने संपन्न अशा उत्तराखंडमध्ये होणाऱया बेछूट वृक्षतोड आणि पर्यावरणाचा नाश करणारी धरणाची बांधकामे याविरोधात हे तीव्र आंदोलन होते. गावागावांतून महिला, बालके, पुरुष यांनी वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी झाडाला मिठी मारून आंदोलन केले. सुंदरलाल बहुगुणा, चंडीप्रसाद भट हे या आंदोलनाचे प्रणेते. दोघेही उत्तराखंडचे भूमिपुत्र.

लोकसहभागातून हे जे मोठे आंदोलन उभे राहिले, त्याची दखल घेणे सरकारला भाग पडले. कायद्यात सुधारणा झाल्या. वृक्षतोडीवर निर्बंध आले. या सर्व आंदोलनाची मुळापासून माहिती घेण्यासाठी 1978 साली महाराष्ट्रातून तरुण कार्यकर्त्यांची एक फळी तिथे गेली. तरुण लेखक आणि कार्यकर्ते जगदीश गोडबोले हे त्यांचे नायक. उत्तराखंडमधील या भटकंतीबद्दल, तिथल्या अनुभवांवर त्यांनी ‘प्रेरणा चिपकोची, भटकंती गढवालची’ हे पुस्तक लिहिले.

जगदीश गोडबोले हे मुळातच सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते. मात्र कुठल्याही पक्षाचे, विचारसरणीचे लेबल त्यांनी स्वतला लावू दिले नाही. तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते मोठय़ा नेत्यांपर्यंत त्यांचा दांडगा लोकसंपर्क. पर्यावरण हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय. पुस्तकांची भाषांतरे, स्वतंत्र लेख या माध्यमातूनही त्यांनी पर्यावरण जागृती केली. गढवाल, उत्तराखंड इथे होत असलेल्या आंदोलनाची माहिती त्यांना मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भेट देऊन त्याची माहिती घेणे आणि ती सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे त्यांना अगत्याचे वाटले. या पुस्तकात सर्व टीम उत्तराखंडला जाण्यापासून ते परत येईपर्यंत त्यांना आलेल्या अनुभवांचे वर्णन करण्यात आले आहे. सामाजिक चळवळी, आंदोलने ही तशी गंभीर बाब. मात्र लेखकाने आपल्या नर्मविनोदी शैलीत सर्व घटनाक्रमांचे निवेदन केले आहे. त्यामुळे पुस्तक कंटाळवाणे होत नाही आणि आंदोलनाचे गांभीर्य वाचकाच्या मनावर ठसवण्यात यशस्वी होते.

गढवालमध्ये जाण्यापूर्वी गोडबोले यांना ही मौजमजेची ट्रिप नसून गांभीर्याने करायचे काम आहे याचे भान होते. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांची एक फळी निवडण्यात आली. या उपक्रमाचा खर्च काही प्रमाणात सामाजिक संघटनांनी उचलला. 1978 साली या प्रवासासाठी प्रत्येकी चारशे रुपये गोळा करणेही कार्यकर्त्यांना कठीण होते हे आजच्या काळात वाचल्यानंतर त्या पिढीने केलेल्या कष्टांची जाणीव होते.

पन्नासेक वर्षांपूर्वी इंटरनेट नाही, मोबाईल नाही, टेलिफोन अगदी मर्यादित स्वरूपात. ट्रेनच्या प्रवासाचे आरक्षण करताना उडालेली तारांबळ, सरकारी बाबूगिरीचा आलेला अनुभव याचे तपशीलवार वर्णन गोडबोले यांनी केले आहे. प्रत्यक्ष प्रवासात अनेक अडचणी आल्या. त्यांच्यावर मात करत टीम एकदाची उत्तराखंड येथे पोहोचली. ज्या-ज्या गावांमध्ये आंदोलन सुरू होते, त्या-त्या ठिकाणी जाण्यासाठी गट करण्यात आले.

बाहेरून आलेले लोक दिसल्यावर स्थानिक लोक अगोदर संशय घेणार, माहिती देणार नाहीत याची कल्पना होतीच. त्यामुळे स्थानिकांचा विश्वास संपादन करून त्यांना बोलते करणे महत्त्वाचे होते. चळवळीशी संबंधित गावागावांत कार्यकर्त्यांशी आधी संपर्क साधून, त्यांच्यामार्फत गावकऱयांशी संवाद करायचे प्रयत्न सुरू झाले. प्रथम बिचकत बोलणारे गावकरी विश्वास बसल्यानंतर अगदी खुलून बोलू लागले.

कार्यकर्त्यांनी फक्त लोकांची भेट घेतली नाही, तर सरकारी संस्थांमध्ये जाऊन, तिथल्या अधिकाऱयांना भेटून सरकारचा दृष्टिकोन समजून घेतला. अनेक सरकारी अधिकारी हे लोककल्याणाचे चांगले काम करत असल्याचे लक्षात आले. चंडीप्रसाद भट, सुंदरलाल बहुगुणा यांचे काम टीमने बघितले. त्यांच्याशी संवाद साधला.

हे सर्व लिहीत असताना गोडबोले जगातील अशाच अनेक घटनांकडेही लक्ष वेधतात, ज्यामुळे पर्यावरणाची हानी झाली. उदाहरणार्थ, अमेरिकेतील ग्रेट डेझर्ट प्लेन, रशियातील व्हर्जिन लँडचे प्रकरण. या उदाहरणांतून जगाने कोणताही धडा घेतला नाही. उत्तराखंड येथील चिपको आंदोलनाच्या नावाचाही इतिहास राजस्थान येथे दोन शतकांपूर्वी झालेल्या आंदोलनात दडला आहे. पर्यावरणासाठी लढा देणाऱया कार्यकर्त्यांच्या परंपरेतील हे पुस्तक अभ्यासक तसेच सामान्य वाचक यांनी आवर्जून वाचावे असे आहे.