उमेद – पर्यावरणाचे संस्कार

>> अनघा सावंत

‘एक सुरुवात आपल्यापासून’ या ब्रीदवाक्याने समाजकार्याला सुरुवात करणाऱया पिंपरी-चिंचवड येथील वैष्णवी पाटील गेली 16 वर्षे पर्यावरण संरक्षणासाठी काम करत आहेत. या कार्यातूनच पुढे त्यांनी ‘आरंभ फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. प्रामुख्याने देशी झाडांच्या बियांचे संकलन करणे हे महत्त्वपूर्ण कार्य करण्याबरोबरच त्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना आणि गरजूंना विविध प्रकारे मदतीचा हात देत आहेत. शाळेत असताना वैष्णवी यांना झाडांना नित्यनेमाने पाणी घालताना पाहून एका शिक्षकांनी ‘पेन आणि वही’ बक्षीस म्हणून दिले होते. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले बक्षीस होते. याच संस्काराने पुढे जाऊन मोठे स्वरूप घेतले.

‘आरंभ फाऊंडेशन’च्या स्थापनेविषयी त्या म्हणाल्या, सांसारिक जबाबदाऱया पार पाडत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून मी माझ्या क्षमतेप्रमाणे सेवाकार्याला सुरुवात केली. वृक्षारोपण करणे, पक्ष्यांसाठी चारा-पाण्याचे स्टॅन्ड लावणे, विविध संस्थांमध्ये जाऊन सेवाकार्य करणे, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, शाळेतील ग्रंथालयाला पुस्तके देणे असे कार्य मी सोळा वर्षांपूर्वी सुरू केले. यात मला कुटुंबियांचीही पूर्ण साथ मिळाली. आज या कार्याच्या रूपाने ‘आरंभ फाऊंडेशन’चा वटवृक्ष भक्कमपणे उभा आहे. झाडांच्या बियांच्या संकलनावर काम करणारे लोक खूप कमी आहेत. मला हे कार्य वाढवायचे असून सुसज्ज, बीज संवर्धनात्मक देशी वृक्ष बीज बँकही उभी करायची आहे. त्यासाठी मदतीची आवश्यकता आहे.

संस्था महाराष्ट्रभर देशी झाडांच्या बीज संकलनाची मोहीम राबवते. आजपर्यंत संस्थेने 25 लाखांहून अधिक बिया वेगवेगळ्या सामाजिक संस्था, वन विभाग, निसर्गप्रेमी यांना निःशुल्क दिल्या आहेत. आरंभ फाऊंडेशनकडून
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची सव्वादोन लाखांहून अधिक बियांची तुला करून त्या अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेला सुपूर्द करण्यात आल्या. आतापर्यंत मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील असंख्य जिह्यांमध्ये संस्थेमार्फत बिया देण्यात आलेल्या आहेत.

संस्थेच्या माध्यमातून वैष्णवी यांनी नर्सरी उभारली असून अनेकांना निःशुल्क रोपे दिली जातात. तसेच शेतकऱयांना ‘बांधावरती चला लावू एक तरी झाड‘ या प्रेरणेतून झाडे देण्यात येतात. संस्थेने आळंदी, सिद्धबेट तीर्थक्षेत्र येथे साडेतीनशेहून अधिक झाडे लावून ‘पंचवटी उद्यान’ उभे केले आहे आणि अजूनही सातत्याने तिथे संवर्धनाचे कार्य चालू आहे. हडपसर वन विभाग, जम्मू-कश्मीर येथील आर्मी कॅम्प, विविध अनाथाश्रम, वृद्धाश्रम, शाळा, शेतकऱयांच्या बांधावर वृक्षारोपण केले आहे. संस्थेतर्फे बियांचे प्रदर्शनही भरवले जाते तसेच मुलांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळांमधून सहजसोप्या पद्धतीने रोपे तयार करण्याची कार्यशाळा घेतली जाते. खास करून मुलांना निसर्ग संवर्धन कार्याकडे नेत बियांचे संकलन, वृक्षारोपण, माझे प्लास्टिक माझी जबाबदारी अभियान, नदी स्वच्छता अभियान, शिवजयंती, दुर्ग भ्रमंती असे अनेक उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत.

आपल्या मुलांच्या भविष्यासाठी पालक म्हणून ही धरणी माता स्वच्छ, सुंदर आणि सुदृढ ठेवून आपण गेले पाहिजे, नाहीतर आपली मुले आपणास माफ करणार नाहीत, असे सांगणाऱया वैष्णवी झाडांतही जीव असतो हे जाणून आपल्या लेकरासारखा त्यांचा सांभाळ करण्याचे दायित्व निभावत आहेत.  [email protected]