गळ्यात सुपारी, संत्र्यांची माळ, हातात फलक; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक

आजपासून राज्यविधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झालं. या अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी विधीमंडळाचा परिसरात सरकारविरोधात घोषणा देऊन दणाणून सोडला. नागपूर विधानभवनात दाखल होत विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध व्यक्त केला. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी देखील विरोधकांनी केली.

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हातात निषेधाचे काळे फलक हाती घेत खोके सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या आमदारांकडून शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध नोंदवताना विरोधक आक्रमक झाले होते.

विधानभवन परिसरामध्ये गळ्यात संत्रा, सुपारीच्या माळा घालून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन केले. यावेळी विरोधकांच्या हातात विविध मागण्याचे आणि सरकारविरोधी घोषणांचे फलकही होते. ‘बळीराजा अवकाळीने त्रस्त, सरकार मात्र जाहिरातीत मस्त’, ‘विमा कंपन्या झाल्या मालामाल, शेतकऱ्यांना मात्र केलं कंगाल’, ‘शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे’, ‘सरकार सांगते दुष्कार सदृश्य, कारण सरकार आहे अदृश्य’, असे पोस्टर आमदारांच्या हातात होते.

त्यानंतर आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार 420’, ‘शेतकरी विरोधी सरकार हाय हाय’, ‘खोके सरकार हाय हाय’, ‘गद्दार सरकार हाय हाय’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच कापसाला भाव मिळालाच पाहिजे, सोयाबिनला भाव मिळालाच पाहिजे, धान उत्पादक शेतकऱ्याला 1 हजार रुपये प्रति क्विंटल बोनस मिळाला पाहिजे, कापूस उत्पादक शेतकऱ्याला 14 हजार रुपये प्रति क्विंटल भाव, सोयाबिन उत्पादक शेतकऱ्याला 8 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाच पाहिजे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Maharashtra winter session – नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर

गारपिटीमुळे संत्र्यांचे नुकसान झाले असून कापसाच्या शेतीचीही बिकट अवस्था आहेच. मात्र या विषयांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. सरकारला याचे काहीही देणेघेणे नाही. हे सरकार असंवेदनशिल आहे. त्यामुळे आम्ही सरकारला जाब विचारणार, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठणकावले.

कापूस, सोयाबिन, धान, संत्रे गेले तरी सरकारला जाग नाही. सरकार पंचनामे करू, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही म्हणत आहे, मात्र शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याला मदतीची गरज आहे. अवकाळी पासाने पिकं गेली असून शेतकरी त्रस्त असताना सरकार मात्र झोपलेले आहे. त्यांना जागे करण्याचे काम आम्ही करणार, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली.