Maharashtra winter session – नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज गुरुवारपासून नागपूर येथे सुरू झाले. 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनीही हजेरी लावली असून ते थेट सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटासोबत जायचं याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नवाब मलिक हे सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. सुटकेनंतर ते पहिल्यांदाच अधिवेशनाला उपस्थित राहिले. अधिवेशनामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटासोबत जातात याकडे सर्वांचे लक्ष होते.

गुरुवारी सकाळी ते नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेटही घेतली. त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाल्यावर मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिल्याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नवाब मलिक कोणत्या गटासोबत जातात याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.