कमळाबाईने अजित पवार, मिंधे गटाचा गेम केला; कमी जागा मिळाल्याने दोन्ही गटात नाराजी

eknath shinde devendra fadnavis ajit pawar

देशात इंडिया आघाडी विरुद्ध भाजप आणि राज्यात महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत होणार आहे. महाविकास आघाडीने जागावाटप आणि प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र, महायुतीचे जागावाटप काही जागांवरून रखडले आहे. त्यात काही जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. 400 पारचे स्वप्न साकारण्यासाठी भाजपने अजित पवार आणि मिंधे गटाचा गेम केला असून त्यांना कमी जागांवर लढावे लागत आहे. त्यामुळे दोन्ही गटात नाराजी आहे. तसेच अनेक सर्व्हेमध्ये महायुतीची पीछेहाट होत असल्याचे अंदाज आहेत. त्यामुळे भाजपचे 400 पारचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे अंदाज आहेत. त्यामुळे भाजपची चिंताही वाढली आहे.

अजित पवार आणि मिंधे यांच्या गटासाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे. अजित पवार आणि मिंधे महायुतीत असले तरी भाजपच्या दाबावामुळे त्यांना जागावाटपात काही महत्त्वाच्या जागा गमव्यावा लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या गटातील नाराजी उघड होत आहे. अजित पवार गटाला महायुतीत चारच जागा मिळाल्या आहेत. त्यांना सहा जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच शिंदे गटाला मिळतील तेवढ्याच जागा आम्हालाही हव्या, अशी त्यांच्या गटाची मागणी होती. मात्र, त्यांची चार जागांवरच बोळवळ करण्यात आली आहे. तसेच अनेक सर्व्हेनुसार त्यांना मिळालेल्या बारामतीच्या जागेसह चारही जागांवर त्यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकची आणि सातारा ही अजित पवार गटाची हक्काची जागा असल्याचा दावा त्यांच्या गटाकडून करण्यात येत होता. मात्र, भाजपच्या दबावामुळे त्यांना या जागांवर पाणी सोडावे लागल्याने त्यांच्या गटात नाराजीचा सूर आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदारकीचा राजीनाम देत भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला होता आणि राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाची हक्काची असल्याचा दावा होत होता. मात्र, दबावामुळे साताऱ्याची जागा अजित पवार गटाने भाजपला सोडल्याने त्यांच्या गटात नाराजी आहे. जागावाटपांच्या चर्चेत गडचिरोली, परभणीसारख्या जागा अजित पवारांनी महायुतीच्या दबावाला बळी पडून सोडल्याने नाराजी वाढली आहे. साताऱ्याबरोबरच नाशिकची जागा स्वतःकडे घेण्यात अजित पवार कमी पडले, अशी भावना त्यांच्या गटात वाढत आहे. गटातील सर्वच निर्णय अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तिघेच निर्णय घेतात, कोणाला विचारात घेत नाहीत, त्यामुळे अनेक नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

जागावाचपावरून मिंधे गटातही नाराजी असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवारांसमोरच आमच्या एकेक जागा कमी होऊ लागल्या तर शांत बसणार नाही, असा इशारा दिला होता. त्यामुळे जागावाटपात भाजपने आपला गेम केला, अशी भावना अजित पवार आणि मिंधे गटात असल्याने दोन्ही गटातील नाराजी वाढत आहे. महायुतीतील संघर्ष उघड होत असून त्यांच्यात आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.