भाजपने छगन भुजबळांना स्क्रिप्ट लिहून दिली; रोहित पवारांचा आरोप

राज्यात गेल्या काही दिवासांपासून मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. तर दुसरीकडे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी ओबीसी समाजाचा जालना येथे मेळावा झाला, या मेळाव्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नेतृत्व केले. त्यांनी यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह माजी मंत्री राजेश टोपे यांच्यावर आरोप केले, या आरोपांना आज आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच भाजपवरही आरोप केले आहेत.

रोहित पवार यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. आमदार रोहित पवार म्हणाले की, भुजबळ साहेबांचा अनुभव मोठा आहे. मोठी मोठी खाती त्यांनी सांभाळली आहेत. पण त्यांनी ओबीसी खाते बघितलेले नाही, ओबीसी खात्याला निधीची तरतूद कमी आहे. मोठ्या नेत्याने खालच्या पातळीत भाषण केले, त्यांना भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली असे वाटते. भाजप जे बोलत तेच ते बोलण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

‘पंकजा मुंडे म्हणाल्या भाजपच्या काही नेत्यांनी आम्हाला तिथे मेळाव्याला जाऊ नका म्हणून सांगितले. काही नेत्यांनी सांगितलं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. त्यांनी जर पंकजा ताईंना जाऊन दिले नसेल तर कदाचीत पंकजा ताईंचे लोकनेतेपद आहे ते त्यांना पटत नाही. खडसे साहेबांचीही अशीच त्यांनी ताकद कमी केली, असा आरोपही रोहित पवार यांनी केला. लोकांसमोर भुजबळ साहेबांना पुढे करायचे आणि लोकांना ते पटले नाही तर भुजबळच विलन ठरणार , भाजप सुरक्षित राहणार हेच सध्या सुरू आहे, असंही रोहित पवार म्हणाले.