…तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल; भुजबळांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती

मराठा आरक्षण प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सरसकट मराठा समाजाला आरक्षण आणि समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. या मागणीला विरोध करत अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावे पार पडत आहेत. त्यामुळे राज्याच मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यातच आता या वादात जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये शनिवारी राज्यातील तिसरा ओबीसी एल्गार मेळावा झाला. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली. जरांगे पाटील यांच्या हिंदीतील संभाषणाचा व्हिडिओ दाखवत त्यांना डिवचले. या मुद्दयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांवर हल्लाबोल करत महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची भीती व्यक्त केली आहे.

राज्यात आरक्षणाचा विषय गंभीर आहे. याकडे सत्ताधारी गटाने आणि विशेषत: मंत्र्यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. हा गंभीर विषय असल्याने मराठा-ओबीसी वादात दोन्हीकडच्या लोकांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. मात्र, छगन भुजबळ यांच्यासारखे मंत्री जरांगे पाटील यांची खिल्ली उडवत मिमिक्री करत आहेत. त्याचा एक व्हिडिओ आपण पाहिला. हा प्रकार राज्याच्या संस्कृतीला अशोभनीय तर आहेच, सोबतच आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळ यांच्यावर केली आहे. महाराष्ट्रातील जातीय सलोखा टिकवायचा असेल तर अशा प्रलोभनांपासून दूर राहायला हवे, अन्यथा महाराष्ट्राची वाटचाल मणिपूरच्या दिशेने व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती आव्हाड यांनी व्यक्त केली.

इंदापूर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांची हिंदीतील व्हिडिओ क्लिप ऐकवत, त्यांना हिंदी बोलणे जमत नाही, ते अकलेने दिव्यांग झाले आहेत, अशी टीका केली. ते मला येवल्याचं वेडपट म्हणत आहे. पण जरांगे यांचा जन्म झाला होता का नव्हता, तेव्हा मी महापौर आणि आमदार झालो. तेही दोनदा झालो. जरांगे यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावे, असे आव्हानही भुजबळ यांनी दिले आहे. मनोज जरांगे छगन भुजबळ याांच्या वादात आता जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.