विदर्भ, मराठवाड्यात दोन दिवस पावसाचे; मुंबई, कोकणात उष्णतेची लाट

महाराष्ट्रात आता अवकाळी पावसाचा प्रभाव कमी झाल्याने कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशावर गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. आता पुढील दोन दिवस कोकण आणि मुंबई परिसरात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच राज्यावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात मुंबई, ठाणे, कोकण परिसरात उष्णतेची लाट तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाचा इशारा अशी स्थिती आहे. दरम्यान, राज्यात सर्वत्र कोरडे हवामान राहणार आहे. पुढील दोन दिवसांसाठी कोकणात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात अवकाळी पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात एकीकडे तापमानवाढ तर दुसरीकडे अवकाळी पावसाची शक्यता असे वातावरण आहे.