राज्यात वाढत्या उकाड्याने मिळाले मॉन्सूनचे संकेत; आठवड्याभरात सरी कोसळणार

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. अनेक जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे. मॉन्सूनची आगेकूच सुरू आहे. 19 मे रोजी अंदमानात दाखल झालेला मॉन्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. तर 10 जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी राज्यात उन्हाचा प्रकोप वाढण्याची शक्यता आहे.

राज्यासह देशात तापमान चांगलेच वाढले आहे. देशात अनेक राज्यात उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव आणि अकोला येथे तापमानवाढीमुळे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. देशात अनेक ठिकाणी पारा 45 अंशांवर गेला आहे. तर राज्यातही तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. या वाढत्या तापमानामुळे राज्यात मॉन्सूनपूर्व सरींची चाहूल लागली आहे. तापमानामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मॉन्सूनच्या पुढील प्रवासासाठी पूरक वातावरण आहे. तसेच रेमल चक्रीवादळानेही मॉन्सूनच्या पुढील वाटचालीला दिशा मिळणार आहे.

मॉन्सून केरळात 30 मे रोजी दाखल झाल्यास मुंबईसह कोकणात तो 10 जूनच्या आसपास प्रवेश करेव. त्यानंतर 15 जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून खान्देश, नाशिक, नगर, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा विदर्भात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सुमारे 20 जूनपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात सर्वदूर पसरण्याचा अंदाज आहे.

विदर्भात आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यात 26 मे पासून पुढील पाच दिवस 30 मे पर्यंत अवकाळीचे वातावरण निवळून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण, खान्देश, मध्य महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यात अवकाळीच्या स्थितीबरोबरच 1 जूनपर्यंत उष्णतासदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 1 जूनपासून राज्यात ठिकठिकाणी वळीवाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.