महाविकास आघाडीला 70 टक्के जागा मिळतील! शरद पवार यांचा विश्वास

गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी विरोधकांना फक्त सहा जागा मिळाल्या होत्या. यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 60 ते 70 टक्के जागा मिळाल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. एपंदरीत राज्यात आमची परिस्थिती सुधारेल आणि विदर्भात काँग्रेससाठी चित्र अधिक अनुकूल होईल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार आज सातारला आले होते. साताऱयातील भव्य शक्तिप्रदर्शनानंतर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, उमेदवार आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

महायुतीकडून उदयनराजे यांची उमेदवारी अद्यापि जाहीर झालेली नाही. गेले अनेक दिवस भाजपने त्यांना ताटकळत ठेवले आहे. दिल्लीला सुद्धा ते चार दिवस थांबले होते. मात्र, भाजपने त्यांना वेटिंगवर ठेवले आहे, याबद्दल काय सांगाल? असे पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता, राजांच्याबद्दल प्रजेनं काय बोलावं? त्यांची एपंदर स्थिती काय आहे, ती तुम्हाला दिसते! असा टोला त्यांनी लगावला.

सातारा हा स्वातंत्र्यचळवळीत मोलाचे योगदान देणारा जिल्हा आहे. सातारचे लोक पुरोगामी विचाराला नेहमीच पाठिंबा देतात. आज देशात जे घडते आहे, त्याला पर्याय देण्यासाठी इंडिया आघाडी मजबुतीने उभी आहे. या विचाराला पाठबळ देण्यात सातारा जिल्हा अग्रभागी आहे, असे त्यांनी सांगितले.

राजांबद्दल प्रजेनं काय बोलावं

राजांबद्दल प्रजेनं काय बोलावं? त्यांची एपंदर स्थिती काय आहे, ती तुम्हाला दिसते, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजेंना लगावला.

विनाकारण वेगळे वातावरण करू नका

सुनेत्रा पवार यांच्या बाबतीतील टिप्पणीविषयी विचारले असता, आपल्याला तसे म्हणायचे नव्हते, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले. वास्तविक या देशात महिलांना आरक्षण देण्याचा पहिला निर्णय घेणारा मी होतो. z संरक्षणमंत्री असताना लष्करात महिलांना संधी देण्याचा निर्णयही आपण घेतला होता. महिलांना सन्मान व प्रतिष्ठा मिळेल, असे निर्णय आपण घेतले आहेत. अशावेळी कारण नसताना एखाद्या शब्दावरून वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे प्रत्युत्तर पवार यांनी दिले.

लोकसभा निवडणूक आचारसंहिता सुरू असताना राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे, पक्षांच्या निशाण्या झाकून ठेवण्यात येतात. मात्र हाजी अली येथील सर्कलमध्ये जी-20च्या जाहिरातीवर भाजपच्या कमळाची निशाणी अजूनही उघडपणे झळकत आहे. कमळाला आचारसंहिता लागू होत नाही का, असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत.