बनावट सही करून बँक खात्यावर डल्ला

व्यावसायिकाचा 1 कोटी 63 लाख रुपयांचा चेक बनावट सही करून बँक खात्यावर डल्ला मारणाऱया तिघांना दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी अटक केली. तमिल सेलवन, प्रमोद सिंह आणि कृष्णा दलाई अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हे बँकेत वरिष्ठ पदावर काम करतात. त्याच्या बँकेचे एक ग्राहक आहे. ऑगस्टच्या दुसऱया आठवडय़ात त्याचा दिल्ली शाखेतील 1 कोटी 63 लाख रुपयाच्या चेकवर बनावट स्वाक्षरी केली. ती रक्कम एका खात्यात वळती करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली गेली. हा प्रकार ग्राहकाला कळू नये म्हणून सीपीपीएस प्रणालीचा वापर केला गेला. बँकेत जमा केलेला चेक हा बनावट असल्याचे अधिकाऱयाच्या लक्षात आले. त्याने दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांना तमिल आणि प्रमोदची माहिती मिळाली. त्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत कृष्णाचे नाव समोर आले. त्याला भिवंडी परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. कृष्णाकडून पोलिसांनी मोबाईल हस्तगत केला आहे. तो बनावट चेक हा तमिलच्या खात्यात जमा करण्यात आला होता. तमिल आणि कृष्णाने एका खात्यात 1 कोटी 63 लाख रुपये ट्रान्सफर केले. तसेच कृष्णाने 5 लाख रुपये प्रमोदच्या खात्यात जमा केल्याचे तपासात समोर आले आहे. त्या तिघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.