भाजपमुळेच जेलबाहेर आलो, यूट्युबर मनीष कश्यपच्या दाव्याने खळबळ

बिहारचा प्रसिद्ध यूट्युबर मनीष कश्यप याने भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्याने केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कारण, खोटे व्हिडीओ पसरवण्याच्या आरोपाखाली जेलची हवा खावी लागलेल्या मनीषने भाजपमुळे आपण जेलबाहेर आलो असा दावा केला आहे.

मनीष कश्यप याने एक फेक व्हिडीओ प्रसारित केला होता. त्यात तामिळनाडू येथे बिहारच्या प्रवासी मजुरांना मारहाण होत असल्याचं सांगण्यात आलं होतं. या व्हिडीओमुळे तामिळनाडूतील बिहारी मजुरांमध्ये दहशत पसरली होती. या प्रकरणाचे पडसाद दोन्ही राज्यांच्या राजकीय वर्तुळावरही उमटले होते. त्यानंतर त्याला खोटा व्हिडीओ प्रसारित करून दिशाभूल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, मनीष हा सराईत गुन्हेगार असल्याचा युक्तिवाद बिहार राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला होता. त्यामुळे त्याला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिला होता.

त्यानंतर मनीषने भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्याने भाजपमध्ये सहभागी होत असल्याचं म्हटलं. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी आपल्याला दिल्लीला आणलं. याच लोकांमुळे मी जेलबाहेर आलो आणि माझ्या आयुष्यातले वाईट दिवस संपले, असं मनीष म्हणाला आहे. त्यामुळे नवीन वाद उद्भवण्याची चिन्हं आहेत. मनिष याचं खरं नाव त्रिपुरारी कुमार तिवारी असं आहे. त्याचा जन्म 9 मार्च 1991मध्ये बिहारच्या पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील डुमरी महनवा गावात झाला. तो स्वतःला बिहारचा पुत्र म्हणवतो. त्याचं प्राथमिक शिक्षण गावात झालं. तो 2009मधे बारावी पास झाला. त्यानंतर त्याने पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात स्थापत्य अभियंता म्हणून पदवी घेतली. पण, त्याने पदवी मिळवल्यानंतर नोकरी न करता यूट्युबवर पत्रकारिता करू लागला. 2020मध्ये तो चनपटिया इथून अपक्ष म्हणून निवडणुकीलाही उभा राहिला होता.