अजित पवारांनीच छगन भुजबळ यांना मराठ्यांच्या विरोधात पुढे केलं, मनोज जरांगे पाटील यांची टीका

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी वेळ दिला होता, आता पुन्हा सरकारने वेळ वाढवून घेतला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांनी छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलण्यासाठी पुढं केलं आहे, असा आरोप केला आहे. रविवारी गेवराई तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषणाचे आंदोलन करणार आहेत. त्यासाठी 20 जानेवारीला ते अंतरवालीहून मुंबईकडे कूच करणार आहेत. या अनुषंगाने गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे सोमवारी त्यांच्या सभेचे आयोजनही करण्यात आले आहे. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.

मनोज जरांगे म्हणाले की, आतापर्यंत त्यांनी मौन धरले होते. आता त्यांचे पोटातले ओठावर येत आहे. आम्हाला वाटले ते आपल्या पाठिशी असतील. दहा पाच सोडले तर त्यांनी करोडो मराठा तरूणांवर अन्याय केला आहे. ते अपघाताने सत्तेत आले आहेत. आमच्याविरोधात बोलून ते सरकार असल्याचे दाखवत आहेत. मात्र अपघाताने सत्तेत आलेल्या अजित पवारांना आम्ही सरकार मानत नाहीत असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, मराठा आक्षणाच्या विरोधातच त्यांनी आधीपासून काम केले आहे. तुमच्या पक्षातील माणूसच मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत होता. तुम्हीच त्यांना आधीपासून पाठिंबा देत होता का? आताच्या तुमच्या बोलण्यावरुन हेच लक्षात येत आहे. तुम्हीच त्या व्यक्तीला मराठ्यांच्या विरोधात पुढं केलंत हेच लक्षात येतं, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे.