छगन भुजबळांना लोळवलं नाही तर माझं नाव बदलेन; मनोज जरांगेंची बोचरी टीका

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. छगन भुजबळ यांना नीट केल्याशिवाय सोडणार नाही. त्यांना नाही लोळवलं तर माझं नाव बदलेन, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. वाशिम जिल्ह्यातील सभेत बोलताना जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली.

जरांगे यावेळी म्हणाले की, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये प्रेम आहे. सामान्य ओबीसी समाजात आमचं मन गुंततं. एकमेकांना घास दिल्याशिवाय आपण जेवत नाही. कुणाला दु:ख झालं तर एक मिनिटात आपण एकमेकांच्या मदतीला जातो. म्हणून म्हणतो त्यांचं ऐकू नका. चार दोघं जणांना त्यांनी पार्टी दिली असेल. जशास तसं उत्तर देण्यास आम्हाला भाग पाडू नका, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.

भुजबळ यांच्यावर थेट टीका करताना जरांगे म्हणाले की, छगन भुजबळांचं ऐकू नका. त्यांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर सरकारला सुद्धा सुट्टी नाही, असं म्हणताना जरांगे यांनी मराठा समाजाला शांततेने आंदोलन करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की, शांततेत आंदोलन करा. 24 डिसेंबरपर्यंत उग्र आंदोलन करु नका. सर्व मराठा एकत्र आला आहे. आरक्षण मिळेपर्यंत कोणीही वेगळं आरक्षण करायचं नाही. गावागावात जाऊन सर्वांना जागे करा, असं जरांगे पाटील म्हणाले.