मराठा आंदोलनाला टार्गेट करणाऱ्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, अंबादास दानवे यांनी सरकारला सुनावले

ambadas-danve

मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारला असताना त्या आंदोलनाला सरकारमधील मंत्र्यांकडून वेगळ्या पद्धतीने टार्गेट केले जात आहे. अशा मंत्र्यांना थांबवा अन्यथा त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, अशी आग्रही मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केली. मराठा आरक्षणाबाबतच्या प्रस्तावावर बोलताना दानवे यांनी दानवे यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर अनुल्लेखाने जोरदार हल्ला चढवला. सरकारने क्रांतिकारी पाऊल उचलून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ते करताना ओबीसी व धनगर समाजालाही न्याय मिळाला पाहिजे, असे दानवे म्हणाले.

अंबादास दानवे यांनी यावेळी मराठा आरक्षणाबाबत सडेतोड भूमिका मांडली. सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत असताना काही लोक दोन समाजांत दरी निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी भुजबळांचे नाव न घेता केला. मुख्यमंत्री मंत्रिमंडळात एक भूमिका मांडतात आणि त्यांचे काही मंत्री विविध ठिकाणी सभा घेऊन आणि सभागृहातही वेगळी भूमिका मांडून ते त्या समाजाचे मसीहा आहेत अशी प्रतिमा निर्माण करत आहेत. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात अत्यंत खालच्या स्तरावर टीका करत आहेत, असे दानवे म्हणाले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून बसलेत

आमदार चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख असताना त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेटही घेतली नाही. शिंदे समिती निर्माण केली, मात्र त्यांचे मंत्री समितीवरच आक्षेप घेतात. याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणतीही भूमिका मांडत नसून मूग गिळून गप्प बसलेत, अशा शब्दांत दानवे यांनी टीका केली.

मोठी शक्ती आमच्या पाठीशी आहे असे म्हणणाऱया व एकमताने ठराव मंजूर करणाऱया सत्ताधाऱयांनी पुन्हा मराठा आरक्षणाचा प्रस्ताव चर्चेसाठी का ठेवला, असा प्रश्न दानवे यांनी यावेळी उपस्थित केला. आरक्षण दिले म्हणता मग गेले कुठे? आणि गेले नसेल तर कसे देणार? याबाबत कुणीही स्पष्टपणे सांगितले नाही याकडे दानवे यांनी लक्ष वेधले.