छगन भुजबळ यांना मराठा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे

chhagan-bhujbal

अंबड येथील ओबीसी समाजाच्या मेळाव्यात मराठा समाजाबद्दल तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल भडकावू वक्तव्य केल्यामुळे संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज रविवारी पिंपळगाव येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून तसेच घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा ताफा हिंगोलीकडे रवाना झाला.

स्वराज्य या संघटनेने कालच छगन भुजबळ यांची हिंगोली येथील सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज रविवारी हिंगोली रस्त्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भुजबळ यांचा ताफा पिंपळगावमार्गे हिंगोलीकडे जात असताना सकल मराठा समाजाच्या पिंपळगाव येथील कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून ‘छगन भुजबळ यांचा निषेध असो’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ताफा हिंगोलीकडे मार्गस्थ झाला. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी आज सकाळी माधव देवसरकर, पंजाब काळे, संकेत पाटील, दशरथ कपाटे, सुभाष कोल्हे, सदा पुयड यांना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हिंगोली येथील सभेमुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने स्थानबद्ध केले होते.