गो बॅक भुजबळ; येवल्यात मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटलेला असतानाच बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांना आज मराठय़ांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सकाळपासून गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी तें संपर्क कार्यालयातून निघाले. मात्र  सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गो बॅक, गो बॅक, भुजबळ गो बॅक अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवले. भुजबळांचा ताफा गेल्यानंतर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करत त्यांच्या दौऱ्याला विरोध करत निषेध व्यक्त करण्यात आला.

येवला-लासलगाव मतदारसंघाच्या दौऱ्यावर लोकप्रतिनिधींना गावबंदीनंतर भुजबळ गेल्या दीड महिन्यानंतर आले होते. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे  झालेल्या नुकसानीची पाहणी ते शेताच्या बांधावर जाऊन करणार होते; परंतु भुजबळ आणि सकल मराठा समाज यांच्यातील आरक्षणावरून सुरू असलेल्या  वादात येवला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने  मंत्री छगन भुजबळ यांना काळे झेंडे दाखवत भुजबळ गो बॅक अशा घोषणा देण्यात आल्या.  सकाळी आठच्या सुमारास येथील मराठा समाजाचे शाहू शिंदे, बाजार समिती संचालक सचिन आहेर, महेश काळे, पांडुरंग शेळजे, प्रमोद पाटील, प्रिया वरपे, आदेश काळे, दिनेश पायगिरे, गणेश सोमासे आदींच्या प्रमुख उपस्थितीत विंचूर चौफुली येथे भुजबळ यांना जोरदार विरोध करत घोषणाबाजी करण्यात आली. हा विरोध इतका प्रचंड होता की, भुजबळ यांना त्यांचा नियोजित दौऱ्याचा मार्ग बदलावा लागला.

दौरा गुंडाळला

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मुखेड फाटा येथून ते थेट कातरणी येथे गेले. कातरणी येथे  पाहणी करून भुजबळ हे सोमठाणा देश येथे आले. या ठिकाणी मराठा समाजाच्या विरोधाला भुजबळ यांना सामोरे जावे लागले. त्यानंतर भुजबळ हे लासलगावच्या दिशेने कोटमगाव येथे गेले असताना तेथेदेखील त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भुजबळांनी आपला दौरा गुंडाळला व ते नाशिकला परतले.