तिरंगा फडकावून नाहीतर गुंडाळून येईन, कारगिलच्या वाघाची काळीज चिरणारी गर्जना

2252

 ‘युद्ध सुरू असताना मी शहीद झालो तर तिरंग्यात गुंडाळून येईन आणि युद्ध जिंकून आलो तर तिरंगा फडकावून येईन, पण मी नक्की येईन’, अशी गर्जना करणारा कारगिलचा वाघ कॅप्टन विक्रम बत्रा यांची आज 21 वी पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी 7 जुलै, 1999 रोजी कारगिल युद्धामध्ये 24 वर्षीय कॅप्टन विक्रम बत्रा यांना शत्रूशी दोन हात करताना छातीवर गोळ्या खात विरमरण आले होते. 9 जुलै रोजी त्यांचे पार्थिव तिरंग्यामध्ये गुंडाळून पोहोचले तेव्हा संपूर्ण देश दु:खात बुडाला होता.

शत्रूलाही आपल्या शौर्याची दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा या योध्याला हिंदुस्थानी लष्कराने ‘शेरशाह’ तर पाकिस्ताने सैन्याने ‘शेरखान’ असे नाव दिले होते. हिंदुस्थानी सरकारने देखील विक्रम बत्रा यांना मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ प्रदान करत त्यांच्या शौर्याला सलाम ठोकला. तरुण वयात देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वाघाला आज संपूर्ण देश नमन करत आहे.

images

कारगिल युद्धाच्या या वाघाचा जन्म 9 सप्टेंबर 1974 रोजी झाला होता. दोन मुलींनंतर जुळे मुलं जन्माला आल्याने त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव लव आणि कुश असे ठेवले. लव म्हणजे विक्रम आणि कुश म्हणजे विशाल. 12 वीच्या परीक्षेनंतर विक्रम यांनी चंदीगडमध्ये बीएसएसीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. नोदलाची नोकरी नाकारत त्यांनी लष्करात लेफ्टनंटची नोकरी स्वीकारली.

1 जून 1999 रोजी त्यांच्या तुकडीला कारगिल युद्धासाठी पाठवण्यात आले. ‘हम्प’ आणि ‘राकी नाब’ या ठाण्यांवर विजय मिळवल्यानंतर विक्रम यांना कॅप्टन बनवण्यात आले. यानंतर त्यांच्यावर श्रीनगर-लेह मार्गावरील 5140 फुटांवरील टेकडीची जबाबदारी देण्यात आली.

captain-vikram-batra

20 जून रोजी सकाळी त्यांनी या टेकडीवर कब्जा केला. या टेकडीवरून त्यांनी ”यह दिल मांगे मोर” ही विजयी घोषणा दिली. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोटो पेपरमध्ये छापण्यात आला तेव्हा संपूर्ण देश त्यांच्या नावाचा जयजयकार करत होता.

यानंतर त्यांच्या टीमवर 4875 या टेकडीवर तिरंगा फडकावण्याची जबाबदारी आली. लेफ्टनंट अनुज नैयर यांच्यासोबत मिळून त्यांनी अनेक पाकिस्तानी जवानांचा खात्मा केला. त्यांच्यावर सोपवण्यात आलेले मिशन जवळपास पूर्ण होत आले असतानाच आपल्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी लेफ्टनंट नवीन यांचा जीव वाचवताना ते हुतात्मा झाले. स्फोटात जखमी झालेल्या नवीन यांना वाचवताना ‘तू मागे हट, तुला मुलं-बाळं आहेत’, असे म्हणत त्यांनी छातीवर गोळी झेलली आणि ‘जय माता दी’ असे म्हणत त्यांनी प्राण सोडला.

kargil-hero

आपली प्रतिक्रिया द्या