मोबाईलच्या स्फोटामुळे 4 मुलांचा मृत्यू; आई-वडिल गंभीर जखमी

उत्तरप्रदेशातील पल्लवपुरम येथील जनता कॉलनीमध्ये शनिवारी रात्री अत्यंत वाईट घटना घडली आहे. मोबाईलच्या स्फोटामुळे एकाच कुटुंबातील 6 जणांच्या जीवाशी बेतले आहे. या स्फोटामध्ये 4 मुलांचा मृत्यू झाला असून पालकांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या जॉनीचे संपूर्ण कुटुंब जनता कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होते. होळीनिमित्त शनिवारी सगळे घरातच होते. जॉनीची पत्नी स्वंयपाक करत होती, तर त्याची मुलगी सारिका (10), निहारिका(8), मुलगा गोलू (6) आणि चौथा मुलगा कालू (5) हे दुसऱ्या खोलीत होते.

खोलीतीलइलेक्ट्रिकल बोर्डवर मोबाईल चार्जिगसाठी लावला होता. अचानक शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या उडाल्या. चार्जिंगला लावलेल्या फोनने पेट घेतला. ठिणग्या बेडवरील फोमच्या गादीवर पडल्याने गादीने देखील पेट घेतला. यानंतर संपूर्ण खोलीत आग पसरल्याने नवरा बायकोने मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ही गंभीररीत्या भाजला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र निहारिका व कालूला डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर दोन मुलांचाही रविवारी सकाळी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पती-पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

परिसरातील प्रत्यक्षदर्शींच्या मतानुसार, अचानक स्फोट झाला आणि त्यानंतर घराला आग लागली. यानंतर आई वडिलांनी मुलांना वाचवण्या प्रयत्न केला मात्र त्या आगीत सगळे गंभीर जखमी झाले.