वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात एक मोबाईल मिस्टिंग व्हॅन

मुंबईत हिवाळा आल्यामुळे हवेत थांबून राहणारी धूळ आणि धुक्याचा परिणाम कमी करण्यासाठी पालिका सर्व 25 वॉर्डसाठी प्रत्येक एक याप्रमाणे मोबाईल मिस्टिंग युनिट खरेदी करणार आहे. यासाठी सुमारे सहा कोटींचा खर्च केला जाणार आहे. ही वाहने वॉर्डात फिरून पाण्याचे प्रिंक्लर करून धुळीचे प्रमाण कमी करणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून हे काम करण्यात येत आहे.

मुंबईत नोव्हेंबर 2023 पासून हवेच्या प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून दैनंदिन ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ सरासरी 150 पर्यंत नोंदवला जात आहे. यासाठी बांधकामांच्या ठिकाणाहून वाढणारी धूळ हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. हे वायू प्रदूषण डोळय़ांनीही दिसत नाही. त्यामुळे त्याचा धोका जास्त वाढते. यातच आता हिवाळा सुरू झाल्यामुळे धुक्याचे प्रमाणही वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी मोबाईल मिस्टिंग वाहने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मे. एस. ए. एंटरप्रायजेस यांच्याकडून 13 वाहने घेण्यात येणार आहेत. यासाठी 9516 पाळय़ांसाठी प्रतिपाळी 3280 या दराने 3 कोटी 24 लाख 60 हजार 979 रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तर मे. एम.आय. ट्रेडिंग अॅण्ड जनरल सप्लायर्स यांच्याकडून 12 वाहने घेण्यात येणार आहे. यामध्ये 8724 पाळय़ांकरिता 3280 रुपये प्रतिपाळी या दराने 2 कोटी 99 लाख 63 हजार 980 रुपयांचा खर्च केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समिती प्रशासक यांनी मंजुरी दिली आहे.

…तर कंत्राटदाराला पंधरा हजारांचा दंड

कंत्राटदाराने एखाद्या दिवशी सेवा पुरवली नाही तर त्याला 15 हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. शिवाय कंत्राटदाराने कामात कसूर केल्यास, पर्यायी गाडीची व्यवस्था न केल्यास प्रत्येक गाडीकरिता पाच हजार रुपये तर दिलेल्या सूचना न पाळल्यास प्रतिगाडी एक हजार रुपये याप्रमाणे दंडाची वसुली केली जाणार आहे.

असा आहे हवा प्रदूषणाचा धोका

धूर, धुक्यामुळे वाढलेल्या हवा प्रदूषणाचा परिणाम सध्या मानवासह प्राणी, वनस्पती आणि संपूर्ण निसर्गावर दिसून येत आहे. मुख्य आरोग्य प्रदूषकांमध्ये कणिक पदार्थ सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन डाय ऑक्साईड यांचा समावेश होतो.

यामुळे किरकोळ वेदनांपासून ते फुप्फुसाच्या कर्करोगापर्यंत धुके कारणीभूत ठरू शकते. स्मॉगमध्ये असलेले जमिनीवरील ओझोन वनस्पतींच्या वाढीला प्रतिबंध करते. यामुळे पिकांचे, जंगलांचे मोठे नुकसान होते. प्राण्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरते.