मोदी अजूनही झोपेतच आहेत.. भाजप नेत्याचा संताप; पक्षाला सोडचिठ्ठी

मणिपुरमधील हिंसाचार आणि 4 मे 2023 रोजी झालेल्या दोन महिलांची नग्न धिंड व सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे देशभरात भाजप आणि मोदी सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. आता याच मुद्यावर भाजप नेते आणि बिहारमधील पक्षाचे प्रवक्ते विनोद शर्मा यांनी पक्षाला घरचा आहेर देत सोडचिठ्ठी दिली. मणिपुरसारखी भयंकर घटना याआधी देशात कधीही आणि कुठेही घडली नाही. मात्र, पंतप्रधान मोदी अजूनही झोपेतच आहेत, असा हल्लाबोल शर्मा यांनी केला.

मणिपुरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना हटविण्याची हिंमत पंतप्रधान मोदी यांच्यात नाही, असा संताप व्यक्त करीत विनोद शर्मा यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. भाजप नारी शक्ती, बेटी बचाओ, हिंदू राष्ट्र, सनातन धर्माच्या गोष्टी करते. हा आपला सनातन धर्म आहे का? मी हे सगळे सहन करू शकत नाही. त्यामुळे मी अन्यायाविरोधात बोलत आहे, असे शर्मा यांनी म्हटले आहे.