MotoGP ने नकाशात जम्मू-कश्मीर, लडाख हिंदुस्थानपासून वेगळे दाखवले; संतापाचा भडका उडताच माफी मागितली

ग्रेटर नोएडाच्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर आजपासून ‘इंडियन मोटोजीपी’ रेसचे (MotoGP) आयोजन करण्यात आले आहे. 22 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर ही स्पर्धा रंगणार आहे. मात्र ही स्पर्धाच आता वादात सापडली आहे.

‘इंडियन मोटोजीपी’ रेसचे आयोजन करणाऱ्या आयोजकांनी खोडसाळपणा करत हिंदुस्थानच्या नकाशातून जम्मू-कश्मीर आणि लेह-लडाख हे केंद्रशासित प्रदेश वगळले. यामुळे संतापाचा भडका उडाला असून मोटोजीपीवर कारवाईची मागणी जोर धरू लागली. प्रकरण अंगाशी येण्याची चिन्हे दिसताच मोटोजीपीने एक पत्रक काढत जाहीर माफी मागितली आहे.

रेस सुरू होण्यापूर्वी ग्रेटर नोएडाच्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर एका सराव सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सराव सत्राचे थेट प्रक्षेपण येथे लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनवर सुरू होते. यावेळी आयोजक कंपनीने सर्व मर्यादा ओलांडत हिंदुस्थानच्या नकाशाशी छेडछाड केली. हिंदुस्थानच्या नकाशावरून जम्मू-कश्मीर, लेह आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश वगळण्यात आले. त्यामुळे आयोजकांना प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

हिंदुस्थानच्या नकाशाशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सुरू झाली. सोशल मीडियावर स्क्रीनचा फोटो पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांनीही हा मुद्दा उचलून धरला. उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने इंडियन मोटोजीपीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. त्यामुळे इंडियन मोटोजीपीने जाहीरपणे माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

मोटोजीपीने आपल्या निवेदनामध्ये म्हटले की, प्रसारणाचा भाग म्हणून दाखवण्यात आलेल्या नकाशाबद्दल आम्ही हिंदुस्थानातील सर्व चाहत्यांची माफी मागू इच्छितो. यजमान देशाचे समर्थन आणि कौतुक करण्याव्यतिरिक्त कोणतेही वादग्रस्त विधान करण्याचा आमचा हेतू नव्हता. तुमच्यासोबत इंडियन ऑईल ग्रँड प्रिक्सचा आनंद लुटण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत आणि बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवरील आमच्या पहिल्या चाचणीसाठीही उत्सुक आहोत.