सरकारकडून पालिकेची शिक्षण कोंडी

शिक्षण विभागाची 5 हजार 946 कोटींची थकबाकी, 3 हजार 497 कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, इतरांप्रमाणे ते जगाच्या स्पर्धेत मागे पडू नयेत यासाठी महापालिका विविध योजना आणि उपक्रम राबवत असताना राज्य सरकारकडून मात्र महापालिकेची शिक्षण कोंडी सुरू आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे मिळून राज्य सरकारकडून महापालिकेला 5 हजार 946 कोटी 30 लाखांची थकबाकी येणे आहे. थकबाकी मिळावी यासाठी महापालिकेकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, गुणवत्ता वाढीवर भर देणारा, नवे उपक्रम आणि योजनांवर भर देणारा 3 हजार 497 कोटींचा शैक्षणिक अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज पालिका आयुक्त-प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना सादर केला. मिशन मेरिटवर भर देण्यासाठी गेल्या वर्षीपेक्षा 150 कोटी 69 लाखांची वाढ अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी महापालिका शाळांमध्ये मोफत डिजिटल व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जुन्या कल्याणकारी योजना आणि उपक्रम कायम ठेवले आहेत. जुन्या योजनांमध्ये शालोपयोगी वस्तूंचा मोफत पुरवठा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना, अत्याधुनिक बैठक व्यवस्था, बेस्ट बसअंतर्गत मोफत प्रवास, शालेय आरोग्य कार्यक्रम, सॅनिटरी नॅपकिन, आधुनिक अग्निशामक उपकरणांची खरेदी, शिक्षण विभागाच्या उपक्रमांची चित्रफितीद्वारे प्रसिद्धी, क्रीडा संकुल, कौशल्य विकास केंद्र, सीसीटीव्ही पॅमेरा, तासिका तत्त्वावर शिक्षक नियुक्ती, त्याचबरोबर पेंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने सुरू असलेली प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024-2025 या आर्थिक वर्षातही कायम ठेवण्यात आल्या आहेत.

ऑरगॅनिक फार्मिंग

महापालिकेच्या विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक आवड निर्माण व्हावी यासाठी शहरी शेती उपक्रमांतर्गत ऑरगॅनिक फार्ंमगवर (किचन गार्डन) ही योजना महापालिकेच्या दोन शाळांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीची संकल्पना समजावून भाज्या पिकवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या पिकवलेल्या भाज्यांचा वापर मुलांच्या मध्यान्ह भोजनामध्ये केला जात आहे. आगामी काळात महापालिकेच्या 100 शाळांमध्ये ऑरगॅनिक फार्ंमगचा प्रयोग राबवण्यात येणार आहे.

शिक्षक-विद्यार्थ्यांना शब्दकोश

महापालिका शाळांमधील पाचवी ते दहावीच्या सुमारे 1 लाख 70 हजार विद्यार्थ्यांना मॉर्डन स्कूल डिक्शनरी (इंग्रजी-मराठी) तसेच शिक्षकांसाठी प्रत्येक शाळेला एक शब्दकोश याप्रमाणे 1 हजार 200 शाळांना अॅडव्हान्स डिक्शनरी (इंग्रजी-मराठी) देण्यात येणार आहे.

लेखन-संभाषण विकासावर भर

विद्यार्थ्यांमधील लेखन आणि संभाषण कौशल्यासाठी व्याकरणावर भर दिला जाणार आहे. मराठी भाषा चांगली लिहिता-बोलता यावी यासाठी नववी आणि दहावीच्या 19 हजार 401 विद्यार्थ्यांना व्याकरणाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

200 खुल्या व्यायामशाळा

मुंबई महापालिकेच्या 200 शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता खुल्या व्यायामशाळा सुरू करण्यात येणार आहेत. ही योजना राज्य सरकारच्या जिल्हा नियोजन समिती-मुंबई उपनगर आणि मुंबई महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणार आहे.