अजूनही कोरोनाची धास्ती…मुंबईत आजपासून नाकातून बुस्टर डोस

दोन वर्षांपूर्वी मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण जगात हाहाकार उडवणारा कोरोना आता पूर्ण नियंत्रणात असला तरी पालिका मात्र मुंबईकरांसाठी अजूनही कोरोना खबरदारी घेत आहे. यासाठी उद्या 1 नोव्हेंबरपासून संपूर्ण मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस नाकातून देण्यास सुरुवात केली जाणार आहे. यासाठी 24 वॉर्डमध्ये 24 सेंटर कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये 18 ते 59 वर्षे वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना मोफत कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात येणार आहे.

मुंबईत मार्च 2020मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सुमारे वर्षभराने 16 जानेवारी 2021 रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. यामध्ये 18 वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांचे पहिला आणि दुसरा असे दोनही डोस दिल्याने लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र आरोग्य तज्ञांकडून कोरोना व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी ‘बुस्टर डोस’ घेणे आवश्यक असल्याच्या सूचना केल्यामुळे 28 एप्रिल 2023पासून 60 वर्षांवरील नागरिकांना तसेच 23 जून 2023पासून आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱया कर्मचाऱयांना नाकावाटे कोरोना प्रतिबंधक लसीचा ‘बुस्टर डोस’ देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र आता 18 ते 59 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना पहिल्यांदाच नाकावाटे मोफत बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली. दरम्यान, कोरोना नियंत्रणात आल्यामुळे ‘बुस्टर डोस’ला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. मात्र खबरदारी म्हणून नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

यांना मिळणार लाभ

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पालिकेकडून 1 नोव्हेंबरपासून इन्कोव्हॅक लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. कोव्हिशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक लसीचा हा प्रिकॉशन / बुस्टर डोस घेता येईल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रिकॉशन डोस म्हणून इन्कोव्हॅक लस देता येणार नसल्याचेदेखील महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.