खराब रस्त्यांमुळे मालवाहतुकीला रोज 600 कोटींचा ‘खड्डा’, 10 तासांच्या प्रवासाला लागतोय दुप्पट वेळ

>> दीपक पवार

खड्डय़ांच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई-ठाण्यासह महानगरातील सर्व सहा महापालिका आयुक्तांना चांगलेच फैलावर घेतले. रस्ते देखभालीसाठी वर्षभरापूर्वी आदेश देऊनही ढिम्म राहिलेल्या सरकारचे कान उपटले, मात्र मुंबईच नाही, तर राज्यभरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून अशा खराब रस्त्यांमुळे उद्योगधंद्यांचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱया मालवाहतूक उद्योगाचे रोजच्या रोज तब्बल 600 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे.

खराब रस्त्यांमुळे शेतमालही वेळेत कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहोचत नाही. परिणामी, शेतमालाला भाव पाडून मिळतो आणि प्रचंड घाम गाळून पिकवलेली फळे-भाज्या कवडीमोल दराने विकल्या जातात. मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था तर अत्यंत भयावह असून कोकणातून कोल्हापूरमार्गे भाजीपाला मुंबईत आणताना उशीर झाला तर नाशिवंत मालाचे प्रचंड नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगतात. नाशिकवरून मुंबईपर्यंत माल आणण्यासाठी लागणाऱया 10 तासांच्या प्रवासाला दुप्पट वेळ म्हणजे 20 तास लागत असल्याचे ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस कोअर कमिटीच्या बाल मलकीत सिंग यांनी सांगितले.

एका गाडीमागे तीन हजारांहून अधिक नुकसान

मालवाहतूक करणाऱया तब्बल 20 लाख गाडय़ा रोज राज्यभरात धावतात. तास वाढल्यामुळे आपसूकच डिझेल अधिक लागते. रस्ते खराब असल्यामुळे गाडय़ांचा देखभाल खर्च वाढतो. भरमसाट टोल भरावा लागतो. खड्डय़ांमुळे एअर सस्पेन्शनपासून ते अगदी इंजिनपर्यंत सर्वच मेंटेन ठेवावे लागते. खड्डय़ांमुळे मालाचे नुकसान होते ते वेगळे. गाडी महिन्यातून तीन दिवस गॅरेजला लावावी लागते. त्यामुळे एका गाडीमागे तीन हजारांहून अधिक रुपयांचे नुकसान होत असल्याचे दिल्ली ते मुंबई अशी मालवाहतूक करणारे वाहनचालक अजित वर्मा यांनी सांगितले.

दहिसर ते भिवंडी पाच तास

दहिसर नाक्यावरून घोडबंदर रोडमार्गे येणारे ट्रक हमखास ट्रफिक जाममध्ये अडकतात. अजित वर्मा या वाहनचालकाने सांगितले की, ते एकदा सकाळी 9 वाजता दहिसर चेकनाक्यावरून निघाले. त्यांना भिवंडीला पोहोचायला 2.30 वाजले. घोडबंदर रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून भिवंडी रोडचीही प्रचंड दुरवस्था आहे, असे वर्मा यांनी सांगितले.

मुंबईत प्रवेश करताना खड्डय़ांनी स्वागत

 दक्षिणेकडून येणारे ट्रक पनवेलमार्गे मुंबईत प्रवेश करतात. शीळ-पनवेलमार्गे मुंबईत प्रवेश करताना जागोजागी खड्डेच खड्डे पडलेले दिसतात.
 उत्तर हिंदुस्थान, गुजरात, वसई-विरार येथून दहिसर चेकनाकामार्गे मुंबईत प्रवेश केला जातो. घोडबंदरमार्गे पुढे माल पोहोचवताना ट्रकचालकांना मोठी कसरत करावी लागते.
 मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंडमधून ठाणेमार्गे माल मुंबईत आणला जातो. येथून माल आणताना ठाणे-बेलापूर मार्ग आणि ऐरोली टोलनाका येथे खड्डय़ांचा आणि प्रचंड वाहतूककाsंडीचा सामना करावा लागतो.
 राज्यभरात रोज 20 लाख गाडय़ांच्या माध्यमातून मालवाहतूक होते.
 एका गाडीमागे 3 हजार रुपयांप्रमाणे रोज 600 कोटींचे नुकसान.
 10 तास लागतात तिथे 20 तासांचा प्रवास.
 20 टक्के गाडय़ा वाहन चालकांविना उभ्या.
 15 टक्के गाडय़ा रोज गॅरेजमध्ये आणल्या जातात.

चांदा ते बांदा…नुसते हाल

कोकण, मराठवाडा, विदर्भ, सातारा, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, धुळे, नंदुरबार, अमरावती, यवमाळ अशा विविध ठिकाणांहून माल आर्थिक राजधानी मुंबईपर्यंत आणताना वाहनचालकांचे प्रचंड हाल होतात. रस्त्यांमुळे दुप्पट वेळ खर्ची पडत असल्याने आणि दोन ते तीन दिवस गाडी चालवल्यामुळे ब्रेक, क्लच दाबून वाहन चालकांच्या पायाचे अक्षरशः तुकडे पडतात. कमरेचे, मानेचे आजार जडतात. विश्रांती न घेता सतत गाडी चालवल्यामुळे प्रचंड थकवा येतो, असे वाहनचालकांनी सांगितले.

राज्यभरात सगळीकडे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था आहे. माल पोहोचवण्यासाठी दुप्पट वेळ लागत असल्याने वाहनचालक त्रस्त होतात. विश्रांती न घेता सातत्याने गाडी चालवल्याने अपघात वाढलेत. दुसरीकडे कोटय़वधींचे नुकसान होत असून उद्योगधंद्यांच्या पाठीचा कणाच मोडला आहे.- बाल मलकीत सिंग, कोअर कमिटी, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस

जुन्नरहून मुंबईत शेतमाल आणताना प्रचंड तारांबळ उडते. नगर-नाशिक रोडची अवस्था अत्यंत खराब आहे. मढ ते कांजळे येथे रस्त्याचे काम सुरू आहे. खिंड पह्डून रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे, पण हे काम सुरू होऊन पाच महिने उलटून गेले. अशा परिस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीत माल पोहोचायला उशीर होतो आणि भाव पाडून मिळतो.  – अमोल जाधव, शेतकरी, जुन्नर