नगर मनपाच्या 15 लाखांचा अपहार; ठेकेदार संस्थेच्या संचालकावर गुन्हा दाखल

महापालिकाहद्दीत रस्ता बाजू शुल्कवसुलीचा ठेका घेतलेल्या श्री छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार सेवा संस्था, नांदेड या संस्थेच्या संचालकाने वसूल केलेली 14 लाख 86 हजारांची रक्कम महापालिकेकडे भरणा न करता रकमेचा अपहार केला आहे. याबाबत आज कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गणेश भगत असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदार संस्थेच्या संचालकाचे नाव आहे. याप्रकरणी महापालिका मार्केट विभागाचे प्रमुख विजयकुमार नेवतराम बालानी यांनी फिर्याद
दिली आहे.

ठेकेदार संस्थेचे संचालक गणेश भगत यांना महापालिकेने 1 डिसेंबर 2022 पासून शहर हद्दीत रस्ता बाजू शुल्क वसुलीचा ठेका दिला होता. ठेकेदार संस्थेने 1 डिसेंबरपासून 5 जून 2023 पर्यंत महापालिका हद्दीत रस्ता बाजू शुल्क वसूल केले. मात्र, त्याने महापालिकेच्या बँक खात्यात दरमहा 3 लाख 90 हजार 855 रुपये असे 187 दिवसांचे प्रतिदिवस 12 हजार 850 रुपये असे एकूण 24 लाख 2 हजार 950 रुपये भरणे अपेक्षित होते. मात्र, सदर कालावधीत त्याने केवळ 6 लाख 90 हजार 855 रुपयांचा भरणा केला. उर्वरित रकमेचा भरणा करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करूनही ती भरली नाही. त्याने 14 लाख 86 हजार रुपये रकमेचा अपहार केला. याप्रकरणी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी श्री छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार सेवा संस्थेचा संचालक गणेश भगत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बालानी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.