लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी वज्रमूठ बांधण्याची वेळ – नाना पटोले

देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी वज्रमूठ बांधण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. भोकर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ भोकर बसस्थानकाशेजारील मैदानात आज प्रचारसभा झाली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील कदम, लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण, आमदार डॉ. वाजेद मिर्झा, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, अब्दुल सत्तार, प्रकाशराव देशमुख भोसीकर, तालुकाध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील, शिवसेनेचे सतीश देशमुख, तालुकाप्रमुख संतोष आलेवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.

पटोले म्हणाले की, देशासह राज्यातील हुकूमशाही संपवण्यासाठी ही निवडणूक लोकांनी हातात घेतली असल्याने देशात जनतेने मोदी सरकारला नाकारल्याचे चित्र दिसत आहे. देशाचे संविधान संपवण्यासाठी ‘चारशे पार’चा नारा भाजपने दिला असून, हुकूमशाहीच्या दिशेने देशाची सुरू असलेली ही वाटचाल थांबवण्यासाठी वज्रमूठ बांधत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. आदर्श घोटाळ्याची श्वेतपत्रिका निघाल्यामुळे नाही तर सत्तेच्या हव्यासापोटी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे ते म्हणाले. सभेसाठी शहरासह तालुक्यातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी भाजपचे कृउबा संचालक सुभाष पाटील किन्हाळकरसह इतरांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

पटोले यांच्या हेलिपॅड व सभा मैदानासाठी अडवणूक

महाविकास आघाडीच्या प्रचार सभेसाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानाची मागणी करण्यात आली होती. परंतु, बाजार समितीवर अशोक चव्हाण यांच्या गटाचे वर्चस्व असल्याने मैदान आरक्षित नसताना हे मैदान आधीच आरक्षित झाल्याचे सांगून अडवणूक केली गेली. पटोले यांचे हेलिकॉप्टर शहराजवळ उतरण्यासाठी हेलिपॅडची परवानगी प्रशासनातर्पेâ नाकारल्याने शहरापासून आठ किलोमीटर दूर पोमनाळा येथे शेतात हेलिकॉप्टर उतरवण्यात आल्याने या हुकूमशाही धोरणाविरोधात नागरिकांतून रोष व्यक्त होत होता.