मुलांच्या वादातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, नगरमधील घटना; भाजपच्या नगरसेवकासह नऊजणांवर गुन्हा

लहान मुलांच्या भांडणातून झालेल्या मोठय़ा वादावादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी भाजपच्या नगरसेवकासह नऊजणांवर गुन्हा दाखल केला आहे. नगर शहरातील एकवीरा चौकात शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे, अभिजित बुलाख, सूरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुऱहे, राजू फुलारी यांच्यासह अन्य तीन ते चारजणांवर तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे.

एकविरा चौक परिसरामध्ये लहान मुलांचे भांडण झाले होते. ही भांडणे मिटवण्यासाठी अंकुश चत्तर यांनी त्यांच्या भाच्याला पाठवले होते. भांडणे मिटल्यानंतर अंकुश चत्तर यांनी सर्व मुलांना जायला सांगितले. त्याचवेळी तेथे आलेल्या राजू फुलारी यांनी ‘बोलायचे आहे’, असे सांगून अंकुश चत्तर यांना थांबवून ठेवले. याचवेळी दोन दुचाकी आणि मोटारीतून तेथे आलेल्या तरुणांनी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करणाऱया तरुणांच्या हातात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे, गावठी कट्टा होता. बेदम मारहाणीत अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले. यावेळी भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे तेथे आला. रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या अंकुश चत्तर यांच्याजवळ येऊन ‘हा संपला का पाहा रे, नसेल संपला तर त्यास संपवून टाका’, असे म्हणत डोक्यात लोखंडी रॉड हाणला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या जखमी अंकुशला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. दरम्यान, घटनेची माहिती समजताच, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप पदाधिकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माहिती घेत तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

अंतर्गत वादातून मारहाण

अंकुश चत्तर व भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यात अंतर्गत वाद असल्याचे तपासात पुढे आले आहे. शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी घटनेची माहिती घेतली. तसेच जखमी अंकुश याच्यावर उपचार सुरू झाले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

शहरातील कायदा-सुव्यवस्था चव्हाटय़ावर

नगर शहरात ओंकार भागानगरे याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडली आहे. या घटनेला एक महिना पूर्ण होत नाही तोच काल रात्री पुन्हा तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदेसह सात ते आठजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेतील दोघांना आज पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य आरोपी फरारी आहेत. या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था चव्हाटय़ावर आली असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.